संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक:आंबेगावमधील शिवसृष्टीस 50 कोटीचा वाढीव निधी; पानिपत, आग्र्यामध्ये स्मारक उभारणार…

Spread the love

मुंबई- छत्रपती संभाजी महाराज यांचे संगमेश्वर येथे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तर शंभुराजेंचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर अन् समाधीस्थळ वढु बुद्रुकमध्ये भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी 50 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. यासोबतच लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून हरियाणातील पानिपत स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

पानिपतमध्ये मराठ्यांच्या शौर्याचे यथायोग्य स्मारक…

अजित पवार म्हणाले की, स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल.

शिवसृष्टी प्रकल्पासाठी 50 कोटीचा वाढीव निधी…

अजित पवार म्हणाले की, येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आग्र्यामध्ये भव्य स्मारक उभारणार…

अजित पवार म्हणाले की, मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल. तिथेही आमचे मुख्यमंत्री आहेत, आपले मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करतील.

3 ठिकाणी शंभुराजेंचे भव्य स्मारक…

अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी करतो. छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे पहिल्या टप्‍प्यातील काम पूर्ण….

अजित पवार म्हणाले की, चैत्यभूमी दादर, मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम सुरु असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तर भारताचे दिवंगत पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्‍प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य शासनाकडून 220 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुलेंचे स्मारक उभारणार….

अजित पवार म्हणाले की, आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगांव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे त्यांच्या कार्यास साजेसे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगांव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील स्मारकासाठी तसेच त्यांच्या नांवे प्रस्तावित चिरागनगर, मुंबई येथील संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संगमवाडी, पुणे येथील वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page