
रत्नागिरी: “माझ्या छातीत दुखत असल्याने मी कामावर येणार नाही” असे सांगितल्याच्या रागातून एका मजुराला तिघांनी मिळून शिवीगाळ करत लाकडी रिपने डोक्यावर मारहाण केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे घडली आहे. ही घटना सोमवारी दि. ९ जून रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विकास किसन चव्हाण (वय २६, मूळ रा. अलिबादी तांडा, जि. विजापूर, कर्नाटक, सध्या रा. लोवले, ता. संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. विकास यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नामदेव चव्हाण (वय ४६), विनोद नामदेव चव्हाण (वय २२) आणि अनिल चव्हाण (वय २७, सर्व रा. लोवले) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास चव्हाण आणि आरोपी हे सर्व मूळचे कर्नाटक येथील रहिवासी असून सध्या ते लोवले येथे वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी आरोपी नामदेव चव्हाण याने विकास यांना, “तू कामावर का जाणार नाहीस?” अशी विचारणा केली. त्यावर विकास यांनी, “माझ्या छातीत दुखत असल्याने मी कामावर येणार नाही, पण तुम्ही मला सकाळपासून का मारणार होता ते सांगा,” असे प्रतिउत्तर दिले.
याचा राग आल्याने नामदेव चव्हाण याने, “ये, तुझे पैसे अजून फिटले नाहीत,” असे म्हणत विकास यांना शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी, आरोपी अनिल चव्हाण याने जवळच पडलेली लाकडी रिप उचलून विकास यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मारून त्यांना जखमी केले.
दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या विकास यांच्या पत्नी आरती चव्हाण यांनाही आरोपी नामदेव चव्हाण याने ढकलून दिले, ज्यामुळे त्या जमिनीवर पडल्या. त्यानंतर तिन्ही आरोपींनी संगनमत करून विकास यांना पुन्हा शिवीगाळ करत मारहाण केली.
या घटनेनंतर विकास चव्हाण यांनी मंगळवारी (दि. १० जून) मध्यरात्री पावणेदोन वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नामदेव चव्हाण, विनोद चव्हाण आणि अनिल चव्हाण यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार व्ही. व्ही. मनवल करत आहेत.