*केंद्राने घेतली डमी विद्यार्थ्यांकडून परीक्षा,अभाविपकडून पोलिसात फिर्याद,बोगस आधारकार्डचा वापर, राजकीय वरदहस्त तर नाही ना?….पोलिसांच्या तपासाकडे लक्ष..*
*रत्नागिरी : प्रतिनिधी-*
बोगस आधारकार्ड बनवून खोटे प्रवेश दाखवून शासनाची फसवणूक करणाऱ्या ८ जणांवर भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम ४२०, ४६५, ४६८,४७१, २०१,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौशल्य विकास केंद्रातील या घोटाळ्याचा पर्दापाश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या धाडसी विद्यार्थ्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्राकडून हजारो बोगस विद्यार्थ्यांना दाखवून घोटाळा केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या कौशल्य विकास केंद्रांची चौकशी होणे गरजेचे आहे. या घोटाळ्यामागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू असून त्यादृष्टीने तपास व्हावा, अशी कुजबूज शहरात सुरू आहे.
राज्य शासनाच्या रत्नागिरीत सुरू असलेल्या कौशल्य विकास केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखविण्याचे काम सुरू आहे. तसेच या विद्यार्थ्याच्या जागी बनावटी विद्यार्थ्याचे कागदपत्रे बनवून परीक्षा देण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या जागी बोगस विदयार्थी बसविण्यात येते. त्यासाठी बोगस आधारकार्ड, कागदपत्रे बनविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा प्रकार उघडकीस आणला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा घोटाळा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
*डीन, प्रिन्सीपलसह आठ जणांवर गुन्हा…*
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या धाडसी विद्यार्थ्यांनी हा घोटाळा उघड केला असून रत्नागिरी पोलीस स्थानकात ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौशल्य विकास केंद्राचा डीन अमोल गोठकडे, प्रिन्सिपल रचना व्यास, शिक्षक श्रीनिवास माने यांच्यासह अन्य श्वेता खानविलकर, फहीम नाजीम शेळगे, नेहा नितीन कांबळे, प्रियांका रमेश चव्हाण आणि अन्य एका अज्ञातवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांचे धाडस…*
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्य असलेली एक विद्यार्थिनी या केंद्राची माजी विद्यार्थिनी राहिली आहे. तिला बोलावून बनावट आधारकार्ड व नावावर परीक्षा देण्याचे सांगण्यात आले, त्यावेळी तिने धाडस दाखवून हा प्रकार उघडकीस आणला आहे. अनेक विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचे फोटो घेवून बनावट नावाची आधारकार्ड तयार करून त्यांना परीक्षा देण्यास भाग पाडण्यात फिर्यादीत म्हटले आहे. या घोटाळ्याच्या मागे राजकीय धेंडे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या अंगाने तपास होण्याची गरज आहे.
*वर्षभरात झालेल्या बोगसगिरीला कोण रोखणार?…*
दि.२५ मे २०२३ साली या कौशल्य विकास कैंद्राचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. या केंद्राला दि. २५ मे २०२४ साली वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरात ७०० विद्यार्थी प्रशिक्षित होवून बाहेर पडले आहेत. असे असले तरी यातील किती जणांनी बोगसगिरी करून कौशल्य मिळवले आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.