रत्नागिरी : आचारसंहिता जाहीर होऊन सुमारे आठवडा झाला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर झाली असून त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी आणि बैठका घ्यायला सुरुवातही केली आहे. महायुतीकडून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने सुमारे महिनाभरापूर्वीच इच्छा व्यक्त केली आहे . मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं तरच निवडणूक लढवण्यास तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते याबाबत शेवटपर्यंत आग्रही राहिले तर शिंदे गटाला उमेदवारी मिळूनही विद्यमान खासदार राऊत यांना तोंड देऊ शकेल, अशा क्षमतेचा अन्य उमेदवार त्यांना मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
दुसरीकडे भाजपाचे स्थानिक पदाधिकारीही या जागेबाबत आग्रही असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपाचे या लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार हे नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत. पक्षांमध्ये चाललेल्या चर्चेनुसार विनोद तावडे यांचे नाव महायुतीमध्ये ठरलेल्या असून तीस तारखेला जाहीर होणार असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्याचबरोबर महायुतीकडून उमेदवाराचं नाव जाहीर होण्यास उशीर होत आहे तशी नवनवीन नावं चर्चेमध्ये पुढे येत आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि सध्या पक्ष संघटनेत केंद्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका पार पाडत असलेले विनोद तावडे यांचाही त्यामध्ये समावेश आहे. आता सामंतांनी भाजपाचं चिन्ह स्वीकारावं म्हणून दबाव तंत्र आहे, की भाजपाचे राज्य आणि केंद्र पातळीवरचे नेते ही चाचपणी गंभीरपणे करत आहेत, याबाबत संदिग्धता आहे. एक मात्र खरं, सुमारे महिनाभरात भाजपाने ही भूमिका टप्प्याटप्प्याने जास्त तीव्र करत नेली आहे आणि त्याला पूरक म्हणून ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला सोडायची, की भाजपाने लढवायची, की शिंदे यांच्या उमेदवाराने भाजपाचे कमळ चिन्ह घेऊन लढवायची, याबाबतच निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींनी गुलदस्त्यात ठेवला आहे . त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली आहे.
या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, उमेदवार भाजपाचा असो किंवा शिंदे सेनेचा, दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांचं काम किती मनापासून करतील, याला या मतदारसंघात निश्चितपणे मर्यादा आहेत. भाजपाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार बाळ माने किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री नारायण राणे व कुटुंबीय किरण सामंत उमेदवार असतील तर किती मनापासून बळ देतील, याबाबत शंका आहे. माने आणि पालकमंत्री सामंत यांचं तर गेल्या सुमारे पंधरा वर्षांचं राजकीय वैर आहे आणि नारायण राणेंचा मुख्य अजेंडा थोरले चिरंजीव नीलेश यांचं राजकीय पुनर्वसन करणं, हा आहे. त्यामुळे उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला आणि कोणी कितीही आणाभाका घेतल्या तरी या वितुष्टाचे पडसाद निवडणुकीच्या मतदानामध्ये पडणार आहेत.