परभणीत संविधान प्रतिकृतीच्या अवमानाचे तीव्र पडसाद; शेकडोंच्या संख्येने लोक रस्त्यावर; परभणी बंदला हिंसक वळण; आंदोलकांनी बंद दुकाने, वाहनांवर, पोलिसांच्या गाड्यांवर केली दगडफेक…

Spread the love

परभणी- परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली तसेच बंद दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली असून तोडफोड व जाळपोळही करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावाची स्थिती आहे.

परभणी शहरातील जिंतूर रोडवर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाला आता हिंसक वळण आले आहे. पोलिस आणि आंदोलक आमनेसामनेआल्याने तणावपूर्ण स्थिती आहे. परभणी जिल्ह्यात कलम ३७ (१) अन्वये जमावबंदी लागू असतानाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केले आहे. जिल्हाभर सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध आहे. भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स केंद्र, ध्वनिक्षेपके व इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ११ डिसेंबरच्या दुपारी १ वाजेपासून हे आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलिसांनी संतप्त झालेल्या जमावावर अश्रू धुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.

परभणीत शहरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेची केलेल्या नुकसानीच्या प्रकरणात आज परभणी बंद ठेवण्यात आले होते. या बंदला हिंसक वळण लागले असून आंदोलक तरुणांनी अनेक गाड्या तसेच दुकानांवर दगडफेक करून तोडफोड केली.शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आले. आंदोलनास हिंसक वळण लागल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला असून दंगल विरोधी पथकही रस्त्यावर उतरले आहे. शहरातील आर.आर. टॉवर परिसरामध्ये आंदोलकांनी प्रचंड दगडफेक केली. बंद दुकानांवरही दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, आंदोलक यांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी गावडे यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. सर्वांना शांततेचे आवाहन केले. मात्र अचानक महिलांचा एक घोळका जिल्हाधिकारी कार्यालयात घुसला आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page