पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा; काळे दाम्पत्य मानाचे वारकरी..

Spread the love

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्निक आणि भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते प्रथेनुसार महापूजा करण्यात आली.

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पार पडली. विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपुरात आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठुनामाचा गजर सुरू केला.

शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. याशिवाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे, खा. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

विशेष म्हणजे आज प्रथमच विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि भाऊसाहेब मोहिनीराज काळे व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे या मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते प्रथेनुसार पूजा करण्यात आली. दरम्यान महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांना तुळशीची माळ देत पूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणारी ही दुसरी शासकीय महापूजा आहे. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने एकनाथ शिंदे आणि मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

हे आहेत मानाचे वारकरी

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी येथील भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांना विठ्ठल-रूक्मिणीच्या महापूजेचा मान मिळाला आहे. आज एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन व्हावे, यासाठी ते सकाळी ६ वाजल्यापासून रांगेत उभे राहिले होते. गेल्या ३० वर्षांपासून करोनाचा दोन वर्षांचा अपवाद वगळता न चुकता त्यांनी जोडीने वारी केली असल्याचे सांगण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page