
*मुंबई :* मुंबईमधील मोक्याच्या ठिकाणी असलेला एक अत्यंत महत्त्वाचा भूखंड आता धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली कवडीमोल दरात अदानी समुहाला दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. नव्या प्रकरणामध्ये मुंबईतील तब्बल १३०० कोटी रुपये किंमत असलेली जमीन अदानी समुहाला अवघ्या ५७ कोटी ८६ लाखांमध्ये देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप ‘आपली लोक चळवळी’ने केला असून हा सारा व्यवहार म्हणजे मोठा जमीन घोटाळा असल्याचं सांगत या प्रकरणी न्यायालयात धाव घेण्याची तयारी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कशासाठी दिली जातेय ही जमीन ?…
मुंबईतील अनेक ठिकाणच्या जागा कवडीमोल दरात अदानी समुहाला दिल्या जात असतानाच आता यामध्ये कुर्ला मदर डेअरीच्या जागेचाही समावेश होत असल्याचा आरोप केला जात आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांचे मुंबईत अन्यत्र पुनर्वसन केले जाणार आहे. भाडेतत्वावरील घरांच्या माध्यमातून त्यांना घरे दिली जाणार असून या घरांची बांधणी अदानी समुहाच्या ‘नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडून (एनएमडीपीएल) केली जाणार आहे. त्यानुसार धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) माध्यमातून मुंबईतील विविध ठिकाणची १२०० एकर जागेची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती.
कुर्ल्यातील नागरिक आक्रमक…
मागणीनुसार डीआरपीला मुलुंडसह अन्य काही ठिकाणच्या जागा देण्यात आल्या आहेत. यात कुर्ल्यातील मदर डेअरीच्या २१ एकर जागेचा समावेश आहे. ही जागा डीआरपीला हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र ही जागा देण्यास कुर्लावासियांचा प्रचंड विरोध असून यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या जागेवर उद्यान साकारण्याची मागणी कुर्लावासियांची केली आहे. मात्र त्यांच्या या मागणीकडे काणाडोळा करीत सरकारने ही जागा डीआरपीला हस्तांतरित केली आहे. या जागेचा वापर आता एनएमडीपीएलकडून अपात्र धारावीकरांच्या घरबांधणीसाठी केला जाणार आहे. आता ही जागा कवडीमोल दरात अदानीला आंदण दिल्याचा आरोप करीत कुर्लावासीयांनी केला असून ते याविरोधात आक्रमक झाले आहेत.
सध्या कुर्ल्यातील निवासी जागेचा दर १५ हजार रुपये प्रतिचौरस फूट असताना ही जमीन केवळ ६३२ रुपये प्रतिचौरस फूट दराने देण्यात आली आहे. आजघडीला बाजारभावानुसार या जमिनीची किंमत १३०० कोटी रुपये आहे. असे असताना ही जागा केवळ ५७.८६ कोटी रुपयांत देण्यात आल्याचा आरोप ‘आपली लोक चळवळी’चे कार्यकर्ते किरण पैलवान यांनी केला आहे. तांत्रिकदृष्ट्या ही जमीन डीआरपीकडे हस्तांतरित झाली असून ही जमीन डीआरपीच्या नावे राहणार आहे. जमिनीसाठी अदानीच्या कंपनीने पैसे भरले असून जागेचा वापर याच कंपनीकडून होणार आहे. यातून अदानीलाच फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
उच्च न्यायालयात धाव घेणार…
धारावीबाहेरील जागा रेडीरेकनरच्या २५ टक्के दरात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र बाजारभावानुसार १३०० कोटी रुपयांची जमीन ५७.८६ कोटी दरात देण्यात आली आहे. त्यास ‘आपली लोक चळवळ’ने आक्षेप घेतला आहे. निविदेमधील कोणत्या अटी-शर्तीनुसार अदानीच्या प्रकल्पासाठी कमी दरात जागा दिली याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने जनतेला द्यावे, अशी मागणीही पैलवान यांनी केली आहे. हा मोठा जमीन घोटाळा असून याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत. त्यादृष्टीने विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणावर अदानी समुहाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेली नाही.