महाराष्ट्रात ‘या’ गावात उद्या पुन्हा विधानसभेची निवडणूक, गावकरी थेट बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार…

Spread the love

उत्तम जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएमचे कटकारस्थान असल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. मारकडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने 80 टक्के मतदान झालेले असताना ईव्हीएममधून वेगळीच आकडेवारी समोर येत आहे.

सोलापूर /प्रतिनिधी- सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी गावाची सध्या चर्चा आहे. या मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर विजयी झाले आहेत. पण मारकडवाडी गावामध्ये महायुतीच्या राम सातपुतेंनी मोठी मतं मिळवली. त्यामुळे शंका आलेल्या गावकऱ्यांनी तिथे बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची तयारी दर्शवली आहे. उद्या 3 डिसेंबरला मारकडवाडी गावात मतदान प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. मात्र प्रशासनाने याला विरोध केला आहे. त्यामुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच 2 तारीख ते 5 तारीख कलम 163 ही लागू करण्यात आले आहे.

गावकऱ्यांचा नेमका दावा काय?


उत्तम जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएमचे कटकारस्थान असल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. मारकडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने 80 टक्के मतदान झालेले असताना ईव्हीएममधून वेगळीच आकडेवारी समोर येत आहे. निवडणुकीत राम सातपुते यांना 843 मते, तर जानकर यांना 1003 मते मिळाली आहेत. या मतदानावर गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवून ईव्हीएमची पोलखोल करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. सातपुते यांना मिळालेल्या 843 मतांवर संशय असून, त्यांना गावातून फारतर शे-दीडशे मते मिळायला पाहिजे होती, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

मतदानाचे गावात लागले फलक


बॅलेट पेपरवरील मतदानासाठी गावात फलक लावून मतदानाप्रमाणे सर्व प्रक्रिया घेतली जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापण्यास दिल्या असून, गावातील प्रत्येकाने आपण या निवडणुकीत ज्याला मतदान केले, त्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. राज्यातील बहुतांश नेते ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित करू लागल्याने मारकडवाडी हे राज्यातील पहिले गाव असून, ज्या गावाने थेट बॅलेट पेपरवर मतदान घेऊन ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ करण्याचे पाऊल उचलले आहे. आता उद्या या गावात काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page