
ठाणे: प्रतिनिधी (निलेश घाग) कल्याण येथील पूर्व तिसगाव भागात एका खासगी हॉस्पिटलजवळ एका निमुळत्या जागेत एका इमारत बांधकाम उभारणीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामाचे साहित्य पदपथावर टाकण्यात आल्याने नागरिकांच्या येण्याच्या जाण्याच्या मार्गात अडथळे येतात, असे वृत्त येथील एका जिल्हा वर्तमानपत्राच्या स्थानिक वार्ताहराने प्रसिध्द केले. या वृत्ताचा राग आल्याने जमीन मालक आणि त्याच्या साथीदाराने पत्रकाराला पकडून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
आनंद बळीराम गायकवाड (६४) असे पत्रकाराचे नाव आहे. त्यांनी जमीन मालक रमेश गायकवाड, अनिल गायकवाड यांच्या विरुध्द पत्रकार संरक्षण कायद्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले, तिसगाव भागात चैतन्य रुग्णालय परिसरात एका निमुळत्या जागेत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी लागणारे खडी, वाळू, सिमेंट, मिक्सर इतर बांधकाम साहित्य पदपथावर ठेवण्यात आले आहे. या रस्त्यावरुन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व नागरिकांची येजा असते.
पद पथावरील बांधकाम साहित्याचा नागरिकांना त्रास होतो, असे वृत्त पत्रकार गायकवाड यांनी प्रसिध्द केले होते. या वृत्तानंतर बांधकाम धारकाने तात्काळ साहित्य बाजुला करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ह्या वृत्ताचा परिणाम झाल्याने गायकवाड यांनी साहित्य बाजुला करत असल्याचे चित्रीकरण सुरू केले. त्यावेळी रमेश गायकवाड, अनिल गायकवाड यांनी पत्रकार गायकवाड यांना पकडून चित्रीकरण थांबविण्यास सांगितले आणि आता आम्ही तुला आम्ही सोडत नाही, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. गायकवाड यांनी मुश्किलीने सुटका करुन घेऊन कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
जाहिरात

जाहिरात

जाहिरात



