मुंबई- विधानसभेसाठी बुधवारी सरासरी ६५.०८ % मतदान झाले. २०१९ ची विधानसभा व २०२४ च्या लोकसभेच्या तुलनेत ४ % मतटक्का वाढला. त्यामुळे अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी राज्यात सरासरी ६५.०८ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये सरासरी ६१.१ टक्के मतदान झाले होते, त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली. गुरुवारी अंतिम आकडेवारी जाहीर होईल त्या वेळी आणखी वाढ होईल. लाडक्या बहिणींमुळे मतदानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.
राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सरासरी ७० % अधिक मतदान झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरमध्ये राज्यात सर्वाधिक ८५% तर मराठवाड्यात सर्वाधिक ८०% मतदान संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये झाले. सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी मतदानात कोल्हापूरने (७६.२५%) राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर सर्वात कमी मुंबई ५२% तर उपनगरात ५५% मतदान झाले. आतापर्यंत सर्वाधिक ७१% मतदान १९९५ मध्ये झाले होते, त्याखालोखाल दुसरा विक्रम ३० वर्षांनी नोंदला गेला.
निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागेल. लाडक्या बहिणींचा कौल महायुतीला मिळण्याची शक्यता आहे, तर आरक्षणाच्या मुद्द्यावर नाराज मराठा समाजाने युतीविरोधात मते दिल्याचे संकेत आहेत. वाढलेला मतटक्का पाहता महायुती किंवा आघाडीला स्पष्ट बहुमतानेच सत्ता मिळण्याची शक्यता आहे.
*एक्झिट पोलचा महायुतीला कौल; तीन संस्था मात्र आघाडीच्या बाजूने..*
महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानाची वेळ संपताच बुधवारी सायंकाळी १० संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले. त्यापैकी सात संस्थांनी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला. तर तीन संस्थांनी मात्र महाविकास आघाडीला यश मिळेल, असे भाकीत वर्तवले आहे. यापैकी ७ संस्थांचे निष्कर्ष प्रकाशित करीत आहोत. मात्र यातील बहुतांश संस्थांनी व्यक्त केलेल्या जागांच्या अंदाजामध्ये मोठी तफावत आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी बहुतांश एक्झिट पोल तोंडघशी पडले होते. त्या वेळी हरियाणात काँग्रेसचे सरकार येईल, असे अंदाज वर्तवण्यात आले होते. मात्र निकालात एकतर्फी भाजपची सत्ता आली. त्यामुळे आता महाराष्ट्राचे अंदाज वर्तवताना या संस्थांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून अाले. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा फायदा होईल, असा अंदाज या संस्थांनी व्यक्त केला आहे. तर ज्या संस्थांनी आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे ते मराठा आरक्षण व शेतकरी मुद्द्यावर सरकारविरोधात रोष असल्याचे सांगतात.