
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील शहरी भागासोबतच ग्रामीण आणि अति नक्षलग्रस्त भागांमध्ये आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम हा आरोग्य विभागच करत आहे.दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य विभाग हा अतिसंवेदनशील बनला आहे. कोरोना काळानंतर आरोग्य विभागातील कंत्राटी पदे कमी करण्यात आल्यामुळे आरोग्य विभागावर कमी कर्मचाऱ्यांचा आणि रिक्त पदाचा ताण पहायला मिळत आहे. याचाच फटका रुग्णसेवेवर होत असून अनेक रुग्णांना सरकारी रुग्णालयात कर्मचारी नसल्यामुळे खाजगी रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे.
महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग हा अति महत्त्वाचा विभाग असून गोंदिया जिल्ह्यात या विभागाद्वारे अनेक सोयी सुविधा शहरी भागात सोबतच ग्रामीण आणि आदिवासी बहुत क्षेत्रामध्ये पुरवल्या जातात आहेत. मात्र, सध्या गोंदिया जिल्ह्याचा आरोग्य विभाग सलाईनवर असल्याचे चित्र आहे. त्याला कारणही तसेच आहे, आरोग्य विभागाच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये ५० ते ६० टक्के जागा या अजूनही रिक्त आहेत. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत असून छोट्या मोठ्या कारणांसाठी ग्रामीण रुग्णालयातून नागरिकांना जिल्हा रुग्णालयात जावे लागत आहे. यामुळे रुग्णांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास ही सहन करावा लागत आहे.
एवढेच नाही तर खाजगी रुग्णालयाचा आसरा नागरिकांना घ्यावा लागत आहे.आरोग्य विभाग हा सध्या कंत्राटी डॉक्टर आणि नर्स परिचारिका यांच्या भरोशावर सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच काही कंत्राटी डॉक्टर आणि परिचारिका भरण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु ही तात्पुरती सेवा असल्याने कंत्राटी कर्मचारी योग्य ते काम करत नसल्याचे जिल्हा चिकित्सक यांनी सांगितले आहे. शासनाने जर पूर्णवेळ डॉक्टर आणि परिचारिका यांची नेमणूक केल्यास उत्तम प्रकारे काम होऊ शकते. त्यामुळे कंत्राटी परिचारिका आणि डॉक्टर नेमण्यापेक्षा शासनाने पूर्णवेळ डॉक्टर आणि परिचारिका नेमावी आणि आरोग्य विभागाचे काम व्यवस्थित आणि सुरळीतपणे करावे, जेणेकरून नागरिकांना खाजगी रुग्णालयात जाऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.