
गोंदिया – गोंदिया जिल्हा काँग्रेसमध्ये सर्व काही ऑल वेल नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याची सुरुवात गोंदिया जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून झाली आहे. या निवडणुकीनंतर जिल्ह्यात काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. जिल्ह्यातील काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या आदेश न जुमानणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, यासाठी वारंवार माहिती तक्रार देऊन सुद्धा जिल्हाध्यक्षांनी कोणती कारवाई केली नाही.
जेव्हापासून काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळाले तेव्हापासून कोणत्याही निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश प्राप्त करता आलेले नाही. असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसचे काही कार्यकर्ते काँग्रेसच्या शहीद भोला भवनामध्ये अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलनाला आज पासून बसले आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होत नाही. तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच असल्याचे कॉंग्रेस कार्यकत्यांनी सांगितले आणि जर यांच्यावर कोणतीही कारवाई पक्षाने केली नाही. तर सर्व कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार असून याबाबतीच निवेदन त्यांनी प्रदेश सचिव यांच्यामार्फत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सादर केलेले आहे. आता गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस वाचवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष कोणता निर्णय घेतात हे आता पाहणे महत्त्वाचे ठरेल.