डोंबिवलीत ‘तोतया’ पोलिसांच्या त्रासाने व्यावसायिक, व्यापारी हैराण; पाठलाग केल्यानंतर बहुरुपी गेले पळून

Spread the love

डोंबिवली : पोलिसांचा गणवेश धारण करून ‘बहुरुपी’ शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरत आहेत. व्यापारी, आस्थापना, कार्यालयांमध्ये गटाने जाऊन अस्वस्थतेचे वातावरण निर्माण करत आहेत. या बहुरुपी पोलिसांचा बंदोबस्त पोलिसांनीच करण्याची जोरदार मागणी व्यापारी, व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावरील बाबासाहेब जोशी पथावरील एका इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील वित्तविषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयात दोन दिवसांपूर्वी दुपारच्या वेळेत पोलिसांच्या गणवेशातील बहुरुपी गेले. कार्यालयातील महिला वर्ग भोजन करत बसला होता. मुख्य चालक भोजनासाठी घरी निघून गेले होते. अचानक कार्यालयात पोलीस आल्याने महिला कर्मचारी वर्ग घाबरला. त्यांनी पोलिसांना कार्यालयात येण्याचे कारण विचारले, कार्यालयात बसण्याची विनंती केली. या कार्यालयाचे प्रमुख कोण आहेत, त्यांना आम्हाला भेटायचे आहे, असे सांगून बहुरुपी पोलिसांनी आम्हाला त्यांच्याशीच बोलायचे आहे, असे सांगून महिला कर्मचाऱ्यांशी बोलणे टाळले.

कर्मचाऱ्यांनी घरी गेलेल्या कार्यालय प्रमुखाला तातडीने कार्यालयात बोलावून घेतले. पोलीस आल्यामुळे प्रमुख तातडीने कार्यालयात आले. त्यांनी कार्यालयाच्या दाराशी उभ्या असलेल्या पोलिसांना तुम्ही कशासाठी आला आहात, आम्हाला समन्स आहेत का, असे प्रश्न करून कार्यालयात येण्याचे कारण विचारले. पोलीस या प्रश्नावर निरुत्तर झाले. याऊलट पोलिसांनी कार्यालय प्रमुखासमोर एक वही धरली आणि आम्ही या भागाची सुरक्षा बघतो. या भागात चोऱ्या, भुरटेपणा होणार नाही याची काळजी घेतो, असे सांगून वहीत विशिष्ट रकमेचा आकडा नोंदविण्यास सांगून तेवढी रक्कम देण्याची मागणी केली. त्यावेळी कार्यालय प्रमुखाच्या हा फसवणुकीचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले.

कार्यालय प्रमुखाने पोलिसांच्या शर्टावरील खिशाकडे पाहिले त्यावर लहान अक्षरात बहुरुपी असे लिहिले होते. त्यावेळी प्रमुखाने आपण बहुरुपी आहात का, असा प्रश्न केला. त्यावेळी त्याने होकारार्थी उत्तर दिले. मग तुम्ही आल्यावर आम्ही पोलिसांच्या वेशातील बहुरुपी आहोत असे सांगणे आवश्यक होते. आता तुम्ही एवढा मला त्रास दिला आहे. तुम्ही पोलिसांचा गणवेश घालून पैसे उकळत आहात, आता मी पोलिसांना कळवितो बोलल्यावर एक बहुरुपी पोलीस पळून गेला. दुसऱ्या कार्यालय प्रमुखाने पकडून ठेवला. तोपर्यंत त्याला घाम फुटला होता. आता आपले काही खरे नाही असा विचार करत असताना दुसऱ्या बहुरुप्याने कार्यालय प्रमुखाच्या हाताला जोरदार हिसका देऊन पळ काढला. मग कार्यालय प्रमुखाने बहुरुप्याला पकडण्यासाठी पाठलाग सुरू केला. चोर पळत आहे म्हणून रस्त्यावरील एक चहा विक्रेता बहुरुपी पोलिसाला पकडण्यासाठी रस्त्यावर धावत होता. आता आपल्याला पोलीस ठाण्याची हवा खावी लागेल या विचारातून दोन्ही बहुरुपी पळून गेले. मग चहाविक्रेता, कार्यालय प्रमुखाने पाठलाग करणे सोडून दिले. या बहुरुप्यांच्या नोंद वहीत व्यापाऱ्यांकडून उकळलेले २०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतच्या नोंदी होत्या, असे हा प्रसंग गुदरलेल्या एका कार्यालय प्रमुखाने सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page