
दबाव क्राईम/ बुलढाणा- बुलढाणा जिल्ह्यातील शेंबा या गावाच्या मुख्य महामार्गावर असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमध्ये आज्ञातांनी एटीएममधून २० लाखांची रोकड लंपास केली आहे. ही खळबळजनक घटना आज रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. हा सर्व चोरीचा थरार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला असून कारमधून आलेल्या चार ते पाच अज्ञातांनी हे एटीएम फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
विशेष बाब म्हणजे, या चोरीच्या घटनेतील अज्ञात आरोपी एका आलिशान कारमधून आले असून पहाटेच्या सुमारास अतिशय शांततेने गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून एटीएमचा इमर्जन्सी अलार्म वाजल्याने गावातील नागरिक जागी झाले आणि त्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या कारमधून धूम ठोकली. या घटनेचा पुढील तपास बोराखेडी पोलीस करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश एमटीएमच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. सुरक्षेसाठी केवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, चोरटे अनेक उपाययोजना करून त्यांनाही निकामी करतात. त्यामुळे बरेचदा या आरोपींचा शोध घेण्यास विलंब होत असतो. अशातच आज पहाटेच्या सुमारास गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या या एटीएम वर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत त्यातील 20 लाखांची रोकड लंपास केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गावातील मुख्य रस्त्यावर हे एटीएम असून देखील मोठ्या शिताफीने चोरट्यांनी हे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडले आहे. ही चोरी करण्यापूर्वी त्यांनी या परिसराची पाहणी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या घटनेतील आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.