औरंगाबादमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून तरूणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | औरंगाबाद | फेब्रुवारी ०६, २०२३.

पुण्यातील कोयता पॅटर्न औरंगाबादमध्ये देखील पाहायला मिळाला आहे. कारण वाळूज महानगर परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीवरून चक्क एका २६ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान इसाक शेख आणि इरफान इसाक शेख (रा. सावखेडा तालुका गंगापूर) असे दोन्ही आरोपींचे नावं आहे. तर शुभम भानुदास जाधव (वय २६ वर्षे रा. सावखेडा) असे हल्ला करण्यात आलेल्या जखमी तरुणाचे नाव आहे.

जखमी शुभम भानुदास जाधव याने वाळूज पोलिसांत दिलेल्या फिर्यादिनुसार, इरफान इसाक शेख व त्याचा भाऊ इम्रान इसाक शेख असे दोघेही त्यांच्याच गावात राहतात. तसेच नेहमी वेगवेगळ्या कारणांनी शुभमसोबत वाद करत असतात. मात्र एकाच गावातील असल्याने शुभमने नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, शुभम हा सावखेडा येथील शिवाजी चौकात चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये बसला होता. यावेळी तिथे इरफान आणि इम्रान दोघेजण आले. तसेच इरफानने एकाला फोन लावून, माझ्या व्याजाचे पैसे न देता तू पळून जाणार असल्याचं मला शुभमने सांगितले असल्याचं सांगितले. त्यामुळे बाजूला असलेल्या शुभमने याबाबत त्याला जाब विचारला असता वादाला सुरुवात झाली.

मी कोणाबाबत काहीही बोललो नसताना माझ्या नावाची इतरांना खोटी माहिती देऊन आमच्यात वाद कशाला लावतोस असा जाब शुभमने इरफानला विचारला. तसेच शुभमने समोरील व्यक्तीला घटनास्थळी फोनं करून बोलवून घेतले. आपण कोणाबद्दल काहीही बोललो नसल्याचा खुलासा करायला लागला. त्यामुळे संतापलेल्या इरफाने शुभमची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली. तेवढ्यात इम्रान देखील पळत आला आणि त्याने शुभमच्या तोंडात चापटाने मारहाण केली. यावेळी बाजारचा दिवस असल्याने लोकांची गर्दी झाली. तर नागरिकांनी दोघांचे वाद मिटवत त्यांना वेगळे केले.

गावकऱ्यांनी वाद मिटवल्यानंतर शुभम गावातील पांढर ओहळ येथील लिपाने यांच्या दुकानाजवळ येवुन थांबला. दरम्यान याचवेळी तिथे इरफान आणि इम्रान हे दोघे भाऊ पुन्हा मोटारसायकलवर बसून आले. तर ‘इसको जान से मार डाल’ असे इम्रान म्हणाला. त्यामुळे हातातील लोखंडी कोयता घेऊन आलेल्या इरफानने शुभमवर हल्ला करत त्यांच्या डोक्यात कोयत्याने मारहाण केली. दरम्यान यावेळी शुभम जीव वाचवून पळत असताना, पुन्हा त्याचा पाठलाग सुरु केला. मात्र कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटला आणि वाळूज पोलिसात पोहचला. पोलिसांनी आधी त्याला रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तसेच त्यानंतर इम्रान आणि इरफान दोन्ही भावांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी एकाला अटक देखील केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page