
रत्नागिरी*- जिल्ह्यातील परशुराम सुमारे ५ कि.मी. अंतराच्या घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संपूर्ण घाटाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होऊन तो पूर्ण क्षमता व सुरक्षितपणे वाहतुकीस खुला व्हावा, यासाठी शासकीय यंत्रणेसहीत संबंधित ठेकेदार कंपनीने नियोजन केले आहे. घाटातील शेवटच्या टप्प्यातील अवघड ठिकाणचे चौपदरीकरण करण्यासाठी आज( दि.२७ मार्च) पासून ते सोमवार दि. ३ एप्रिलपर्यत दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांकडे तत्काळ अहवाल मागवून नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २३ मार्च रोजी पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, प्रादेशिक परिवहन रत्नागिरी यांना पाठविलेल्या पत्रानुसार, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून २१ मार्च रोजी घाटातील शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी काही काळ वाहतूक बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार हा निर्णय झाला आहे. सद्यस्थितीत घाटातील कामाच्या प्रगतीचा अहवाल लक्षात घेता, सुमारे घाटाची ५.४० कि.मी. लांबी असून पैकी ४.२० कि.मी. लांबीतील चौपदरीकरण अंतर्गत घाटातील काँक्रिटचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत आहे. उर्वरित लांबीपैकी १.२० कि.मी. लांबी ही उंच डोंगररांगा व खोल दऱ्या असल्याने काम करणे अवघड होत आहे. या लांबीपैकी डाव्या बाजूस सुमारे ५०० मी. लांबीमध्ये दुहेरी बाजूचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. तसेच सुमारे ५०० मीटर लांबीमध्ये मातीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित १०० मी. लांबीतील काम हे अवघड स्वरूपाचे आहे. या लांबीमध्ये सुमा २५ मी. उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम आहे. हे काम चार टप्प्यांमध्ये सुरु आहे. पैकी तीन टप्प्यातील खोदकाम पूर्ण झाले आहे तर चौथ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले आहे. चौथ्या टप्प्यातील १०० मी. मध्ये होणारे काम मोठ्या प्रमाणात अवघड स्वरूपाचे आहे. हे काम करताना घाटातील दगड माती महामार्गावर येऊन अपघाताच शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेत शेवटच्या टप्प्यातील अवघड मार्ग असलेले हे काम पूर्ण करण्याकरिता आजपासून आठ दिवस दुपारनंतर वाहतुकीसाठी सहा तास बंद ठेवावे लागणार आहे. त्यानुसार संबंधित विभागांनी जिल्हाधिकाऱ्यांच्य आदेशानुसार वाहतूक बंद करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. य कालावधीत हलकी वाहने चिपळूण- आंबडस मार्गे वळविण्यात येणार आहेत. तसेच अवजड वाहनांच वाहतूक कोणत्या मार्गावरून केल जावी या बाबत तत्काळ अहवाल मागविण्यात आला आहे.
सलग आठ दिवस होणार काम
परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी काही काळ वाहतूक बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधितांकडून कार्यवाही होण्याकरिता
जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ अहवाल मागितला व त्या नुसार मार्च महिन्यात सोमवार ते एप्रिल महिन्यातील सोमवार असा आठ दिवस परशुराम घाट दुपारनंतर वाहतुकीस सहा तास बंद ठेवण्याचे नियोजन करण्याचा निर्णय झाला आहे.