नगर, शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात आरती पाससाठी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी, तसेच सामान्य भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी यापुढे व्हीआयपी किंवा ग्रामस्थांची शिफारस चालणार नाही. संस्थानचे कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्याकडून होणारी वशिलेबाजी टाळण्यासाठीही नियम कडक करण्यात आले आहेत, अशी माहिती साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
जाधव यांनी ग्रामस्थ आणि प्रशासनाची बैठक घेऊन या निर्णयांची माहिती दिली आहे. बुधवारपासून नियमांची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. साई समाधी मंदिरात जनसंपर्क कार्यालय, सुरक्षारक्षक, मंदिर कार्यालय व संपूर्ण परिसरात अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणताही कर्मचारी मोबाइल वापरणार नाही. आरतीसाठी मिळणारे सशुल्क पासेससाठी शिफारस सक्तीची होती, मात्र ती हटविण्यात आली आहे. द्वारकामाई, गुरुस्थान, समाधी मंदिर या सर्व ठिकाणचे बॅरिकेड हटविण्यात आले आहेत.
ग्रामस्थांना फक्त गेट क्रमांक ३मधून ओळखपत्र पाहूनच आत सोडण्यात येईल. त्यांच्यासोबत बाहेरच्या नागरिकांना प्रवेश मिळणार नाही. नातेवाईक, मित्र व अन्य व्हीआयपी विनापास प्रवेश केल्यास त्या ठिकाणी तैनात असणारे सुरक्षारक्षक व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. ही नियमावली सर्वांसाठी एक सारखी असणार आहे. यामुळे अपप्रवृत्तीला चाप बसणार असून, दर्शनाचा काळाबाजार, व्हीआयपी सशुल्क पासेसचे गैरप्रकार करणाऱ्यांना आळा बसणार आहे.
बदललेले नियम
- आरतीच्या सशुल्क पाससाठीची शिफारस बंद
- ग्रामस्थांना फक्त गेट क्र. ३मधूनच ओळखपत्राधारे प्रवेश
- तेथून इतरांना प्रवेश नाही
- सुरक्षारक्षकांना मोबाइल वापरण्यास बंदी