खेड : (प्रतिनिधी) खेड तालुक्यातील कोंडवली परिसरातील जगबुडी नदी पात्रात गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला बेकायदेशीर वाळू वाहतुकीचा व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. खेड तालुक्याच्या परिसरातून सध्या दररोज २० ते २५ ट्रॅक्टर व डंपर मधून वाळूची खुलेआम बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वाळू तस्करीमध्ये सहभागी असल्याने महसूल कर्मचारी व अधिकार्यांचेही या वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष होत आहे.
काही दिवसांपासून नदीपात्र कोरडे असल्याने वाळू वाहतूक करणार्यांचे चांगलेच फावले आहे. या वाळूतस्करांनी वेगवेगळ्या गावांमधून वाळू उपसा जोरात सुरू केला आहे.
कोंडीवली गावांमधून खुलेआम वाळू उपसा होत असतानाही तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचे या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. वाळू तस्करीमध्ये सत्ताधारीसह विरोधी पक्षांच्या ? महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचार्यांमध्ये उठबैस असल्याने कर्मचारी त्यांच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
वाळूतस्करांनी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला असल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच नदीपात्र बदलले आहे.त्यामुळे नदी किनाऱ्यावलील शेतजमिनीची धूप होऊन शेतीचे नुकसान होत आहे.
तहसीलदार अथवा तहसील कार्यालयातील कर्मचारी कारवाईसाठी येत असल्याची माहिती मिळताच ते वाळू वाहतूक करणार्या चालकांना याची माहिती देतात. यामुळे अधिकारी पोहोचणे अगोदरच वाळूचे डंपर गायब झालेले असतात. तहसीलदारांनी बेकायदेशीर वाळू उपशात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.