डोंबिवलीत कुंभारखाणपाडा खाडी किनारी हरित पट्ट्यात २५० घरांचा बेकायदा गृहप्रकल्प कुणाच्या आशीर्वादाने

Spread the love

ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)

डोंबिवली पालिकेचे आरक्षित भूखंड बेकायदा बांधकामे करुन हडप केल्यानंतर भूमाफियांनी मोर्चा खाडी किनारच्या मोकळ्या हरित पट्ट्यांकडे वळविला आहे. डोंबिवली पश्चिमेत कुंभारखाणपाडा शिवाजीनगर खाडी किनारी भागात चार हजार चौरस मीटरच्या हरित पट्ट्यात आठ माळ्याच्या १० बेकायदा इमारती उभारणीचे काम माफियांकडून वेगाने सुरू आहे. या इमारतींमध्ये सुमारे २५० सदनिका आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेची बनावट बांधकाम मंजुरी कागदपत्र, महारेराचा नोंदणी क्रमांक (पी ५१७०००४६०८७) मिळवून हा प्रकल्प उभारला जात आहे.
उल्हास खाडी किनारचे खारफुटीची जंगले, मोकळे हरितपट्टे नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी एकमेव जागा आहे. आता त्या जागांवरही माफियांनी बेकायदा इमले ठोकण्यास सुरूवात केल्याने पर्यावरणप्रेमी, खाडी किनारी नियमित फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दादागिरी, दहशतीचा अवलंब करुन ही बेकायदा बांधकामे सुरू असल्याने या माफियांना बांधकामे थांबविण्यासाठी रोखायचे कसे असे प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडले आहेत.
हरितपट्टा हडप
कुंभारखाणपाडा खंडोबा मंदिराच्या मागील भागात खाडी किनारी जाण्यासाठी पोहच रस्ता नाही. तरीही या भागातील सर्व्हे क्र. ७९ चा १६ व १७ हिश्यात चार हजार चौरस मीटर (एक एकर) जागेत ६५ बेकायदा इमारती घोटाळ्यात आरोपी असलेले मेसर्स आदित्य इन्फ्राचे विकासक प्रफुल्ल गोरे, मे. निर्माण होम कन्स्ट्रक्शनचे मनोज सखाराम भोईर, त्यांचे भागीदार आदेश बिल्डर्सचे सिध्देश प्रदीप कीर, सिकंदर निळकंठ नंदयाल, कुलदीप रामकिसन चोप्रा यांच्या साहाय्याने १० बेकायदा इमारती उभारणीचे काम हरितपट्ट्यात सुरू आहे. ६५ प्रकरणातील आरोपी मे. गोल्डन डायमेंशन या इमारतींचा वास्तुविशारद आहे.
महसुल विभाग अंधारात

चार हजार चौरस मीटर जागेत मोठ्या प्रमाणात खोदकाम, मातीची भरणी सुरू आहे. स्वामीत्वधन महसूल विभागाला न भरता ही कामे सुरू आहेत. तरीही स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी याविषयी कार्यवाही करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बेकायदा बांधकामाच्या कागदपत्रांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अकृषिक परवानगीची प्रत नाही. स. क्र. ७९ चा १६-१७ हिश्यावर एकूण २८ जमीन मालक आहेत. त्यांच्या स्वाक्षऱ्या नोटरीव्दारे केलेल्या जमीन व्यवहारात आहेत. पालिका नगररचना विभागातील एका वाद्ग्रस्त नगररचनाकाराची सोपी बनावट स्वाक्षरी बांधकाम परवानगीसाठी वापरण्यात आली आहे. महारेराच्या संकेतस्थळावर ही सर्व बनावट कागदपत्र भूमाफिया प्रफुल्ल गोरे, मनोज भोईर यांनी दाखल केली आहेत. या बांधकामाशी संबंधित एका माफियाला संपर्क केला. त्याने प्रतिसाद दिला नाही.

“ कुंभारखाणपाडा स. क्र. ७९ चा हिस्सा १६-१७ हा विकास आराखड्यात हरितपट्टा आहे. याठिकाणी नगरचना विभागाने बांधकाम परवानगी दिलेली नाही.”-ज्ञानेश्वर अडके,नगररचना अभियंता,कडोंमपा

“ या बांधकामधारकांच्या कागदपत्रांची सत्यता पडताळून विहित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या बेकायदा इमारतींवर कारवाई केली जाईल.”-सुहास गुप्ते,साहाय्यक आयुक्त,अतिक्रमण नियंत्रण

“हरितपट्ट्याच्या ठिकाणी किती खोदकाम केले आहे. याची पाहणी करुन स्वामीत्वधन दंड वसुल करण्याची कार्यवाही केली जाईल.-”महसूल अधिकारी,कल्याण

(डोंबिवलीत खाडी किनारी हरितपट्ट्यात उभारण्यात येत असलेला १० बेकायदा इमारतींचा गृहप्रकल्प.)

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page