
ठाणे : दिव्या शहरातील बि. आर.नगर विभागातील समाधान नगर परिसरातील रहिवाशांना कित्येक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नव्हता. अधिकृतपणे पाण्याची बिलं भरून सुद्धा रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी दिवा प्रभाग समिती कडे पत्रव्यवहार करून नव्याने नळ जोडण्या देण्याची मागणी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती. पण गेले २ महिने सतत पाठपुरावा करूनही ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीही ठोस दखल न घेता फक्त आश्वासन देण्यात येत होती.
अखेर येथील रहिवाशांनी मनसेच्या महिला शाखाध्यक्ष निकिता सालप यांच्याशी संपर्क साधून आपली कैफियत मांडली. त्यांनतर मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन रहिवाशांच्या तक्रारीची दखल न घेतल्याबद्दल जाब विचारला, तसेच पुढील दोन दिवसात सर्व रहिवाशांना नवीन जोडण्या देऊन त्यांचा पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर दिवा मनसे रहिवाशांना घेऊन ठिय्या आंदोलन करेल याचा इशारा दिला.
यावेळी दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे,विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, विभाग सचिव परेश पाटील,उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम , ऋषिकेश भगत आणि महिला शाखाध्यक्ष निकिता सालप हे पदाधिकारी उपस्थित होते.