‘फेक न्यूज’चा प्रसार थांबविला तरच बंधन – सतीश लळीत…

Spread the love

रत्नागिरी : फेक न्यूज हे आव्हान आहे. त्याचा उगमस्थान शोधणणं जरी कठीण असले तरी, त्याचा प्रसार थांबविणे शक्य आहे. प्रसार जर थांबविला तर त्यावर बंधन आणू शकतो, असे मार्गदर्शन माजी माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी केले.

विभागीय कोकण माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने घेण्यात  आलेल्या कोकण विभागातील पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेत ‘फेक न्यूज, एआय तंत्रज्ञान, समाजमाध्यम हाताळणी’ या विषयावर ते मार्गदर्शन करत होते.  यावेळी माहिती संचालक हेमराज बागुल उपस्थित होते.

संगणकीय सादरीकरण करुन श्री. लळीत यांनी अतिशय सविस्तरपणे विषयांची मांडणी केली. ते म्हणाले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या म्हणण्यानुसार भारताचा फेक न्यूज मध्ये प्रथम क्रमांक आहे. असत्य, दिशाभूल करणारी माहिती म्हणजे फेक न्यूज होय.  विनोद, उपरोध, व्यंग म्हणून केलेला फोटो फेक स्वरुपात वायरल होतो. क्लिक बेट किंवा आमिष, आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने फेक न्यूज पसरविली जाते. खोडसाळपणा, चुकीचा मेसेज देण्यासाठी, राजकीय सूडापोटी, निंदा-नालस्ती करण्यासाठी बातमी खरी परंतु, संदर्भ खोटा अशा प्रकारेही फेक न्यूज पसरत असते. 

एखाद्या लोकप्रिय मुद्रित माध्यमाचे कात्रण अगदी जुन्या पध्दतीने तयार करणारे सॉफ्टवेअर, संकेतस्थळ उपलब्ध आहेत.  त्याच्या माध्यमातून खोटा मजकूर वापरुन ही बातमी प्रसिध्द झाल्याचे, अशा कात्रणामधून भासविले जाते. हे बनावट खोट्या माहितीच्या आधारे तयार केलेले असते. फेकन्यूज थांबवायची असेल, तर त्याचे उगमस्थान शोधा आणि तपासा.  शीर्षकापलिकडे पहा. लेखक कोण ते तपासा. अन्य सूत्रांचा आधार घ्या. प्रसिध्दीची तारीख पहा. कोणी गंमत तर करीत नाही ना हे तपासा.  स्वत:चे पूर्वग्रह तपासा. त्याबाबत जाणकारांना विचारा. 

फेक न्यूज हे आव्हान आहे.  त्याबाबत शहानिशा केली पाहिजे.  माहिती तंत्रज्ञान कायद्यात शिक्षा, दंड याची तरतूद आहे.  आचारसंहिता बंधनकारक केली आहे. फेकन्यूजचे उगमस्थान शोधणे कठीण असले तरी त्याचा प्रसार करणे हे आपल्या हातात आहे.  ते थांबविले तर, निश्चितपणे आपण बंधन आणू शकतो असेही श्री. लळीत शेवटी म्हणाले. 
    

यावेळी प्र. उपसंचालक अर्चना शंभरकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक संचालक संजिवनी जाधव यांनी सूत्रसंचलन केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page