रत्नागिरी- दसऱ्याच्या आदल्या दिवशी कणकवलीमध्ये हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तणाव झाला होता. विजयादशमीनिमित्त आरएसएसच्या वतीने काढण्यात आलेले पथसंचलन काही समाज कंटकांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकारानंतर मी किंवा माझा सीडीआर कोणत्याही मुस्लिम बांधवाशी बोलण्याबाबत सापडला, तर मी राजकीय संन्यास घेईल, असे उदय सामंत म्हणाले.
उदय सामंत म्हणाले, मी कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नाही. विजयादशमी दिवशी झालेल्या प्रकारानंतर माझे कोणत्याही मुस्लिम बांधवांशी बोलणे झाले असेल, तर मी राजकीय संन्यास घेईन. माझा सीडीआर जरी कोणाशी बोलण्याबाबत सापडला तरीही मी संन्यास घेईन. याप्रकरणी मोहन भागवतांशी बोललो असून संघाच्या लोकांनी मला कुठेही बोलवावे, मी माझी बाजू मांडेन. मी मुस्लिम बांधवांना एका बाजुने सहकार्य करतो, असे उगाच पसरवू नका, असे आवाहनही सामंत यांनी केले.
वक्फ बोर्ड रद्द करायचे असेल तर फडणवीसांकडे घेऊन जाईन…
उदय सामंत यांनी यावेळी रत्नागिरीतील वक्फ बोर्ड कार्यालयावरही भाष्य केले. रत्नागिरीतील वक्फ बोर्ड मी मंजूर केले नाही. ते 23 मार्च 2023 रोजी मंजूर झाले होते. ही मंजुरी महाराष्ट्र शासनाने दिली आहे. माझ्या खात्याचा यात काहीही संबंध नाही. राजमाता गोमाता करण्यात माझा खारीचा वाटा आहे. वक्फ बोर्ड रद्द करण्यासाठी कोणाला यायचे असेल तर मी त्यांना फडणवीसांकडे घेऊन जाईल, असे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले आहे.
नेमके प्रकरण काय?…
रत्नागिरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीच्या पूर्वसंध्येला पथसंचलन काढण्यात आले होते. मुस्लिम समाजातील काही समाज कंटकांनी या संचलनात घुसून घोषणाबाजी केली होती. हे पथसंचलन अडवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे रत्नागिरीसह परिसरात संवेदनशील आणि तणावपूर्ण वातावरण झाले होते. या प्रकरणी माजी नगरसेवक मुसा काझी यांच्यासह सुमारे 100 जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. तसेच समाजकंटकांवर कारवाईची मागणी करणाऱ्या 40 जणांविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.