
जालना :- मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी २३ जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाने दिली आहे. सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार केले असून सर्वेक्षण ३१ जानेवारी २०२४ पूर्वी पूर्ण होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. २० जानेवारी रोजी मनोज जरांगे मुंबईला रवाना होणार आहेत. २६ जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
राज्यात ५४ लाख नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र तत्काळ देण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करून तातडीने जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी दिले. मुंबई दौऱ्यापूर्वी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला महत्वाचा संदेश दिला.
२६ जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण, गुन्हे दाखल झाले तर…
मराठे मुंबईला निघणार आहेत. मराठा समाजाने आता घरी बसू नये. हे शेवटचे आंदोलन आहे. मराठा समाजाने ताकदीने मुंबईकडे निघा. मराठे भीत नाहीत आणि आम्ही गुन्हे दाखल होण्यास घाबरत नाहीत. आम्ही मुंबईला जाणार आहोत. मी आणि माझा समाज २६ जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार आहे. २६ तारखेला गल्ली गल्लीत मराठा समाज दिसणार आहे. मी मरायला घाबरत नाही. मुंबईवरुन आता आरक्षण घेऊन येणार आहे. आपण शांततेत चाललो आहोत. पण आपल्यावर गुन्हे दाखल झाले तर राज्यात लोकशाही नाही, या शब्दांत मनोज जरांगे यांनी सूचक इशारा दिला.
दरम्यान, शासनाकडून सुधारणा आणि दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून नेली जात आहे. अध्यादेश महत्त्वाचा आहे. समितीने किती काम केले हे बघणे महत्वाचे आहे. ड्राफ्ट सुधारणा फक्त बहाणे आहेत. मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. सर्वेक्षण व्हायला पाहिजे आम्ही ते नाकारले नाही पण ते टिकले पाहिजे. सुप्रीम कोर्टाकडून मिळणाऱ्या आरक्षणामुळे नुकसान होणार आहे. आता एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देणे खूप गरजेचे आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
जाहिरात




