बीड- शिवसेना आणि भाजप हे दोन रक्ताचे भाऊ आहेत, अशी गोपीनाथ मुंडे यांची भूमिका होती. त्यांच्या नंतर सगळीच नाती तुटली. ते असते तर कदाचित युती आणि नाती तुटली नसती, अशी खंत ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. तसेच पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा टिकवला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.
गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण इथेच नाहीतर सर्व ठिकाणी येते. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात संकट निर्माण होतात. त्या प्रत्येक वेळेला गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण होते. विशेषता पंचवीस वर्षापेक्षा जास्त शिवसेना भाजप युतीमध्ये होतो. एकत्र राहिलो कधीकाळी मत भेद झाले असतील. भारतीय जनता पक्षामध्ये हे सर्व मतभेद दुरुस्त करणारे जे मंडळ होतं, त्यात गोपीनाथराव मुंडे होते.
राऊत म्हणाले कि, एक अत्यंत जिंदादिल, दिलदार दिलखुलास, असं राजकारणातल्या व्यक्तिमत्व होतं. शिवसेना-भाजपची युती रहावी आणि ती अखंड टिकावी . हे त्यांचं कायम स्वप्न होतं. जाहीरपणे बैठकामध्ये त्यांनी ती भूमिका मांडली. बाळासाहेब ठाकरे यांच्या वरती त्यांची श्रद्धा होती. ठाकरे परिवाराशी त्यांचे जवळचे संबंध होते. शिवसेना आणि भाजप हे दोन रक्ताचे भाऊ आहेत, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या नंतर ती सगळीच नाती तुटली त्यामुळे त्यांची आठवण येते ते असते तर कदाचित युती तुटली नसती.
राऊत म्हणाले, जो आम्ही पाहिला तो भारतीय जनता पक्ष राहिला नाही. महाराष्ट्रातला आणि देशातला अटलजी आणि आडवाणी यांचा केंद्रातला आणि महाराष्ट्रातला गोपीनाथ मुंडे यांचा भाजप राहिला नाही. राऊत पुढे म्हणाले, वारसा असतो, मात्र त्या नेतृत्वाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हे एकच व्यक्तिमत्व, त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. गोपीनाथ मुंडे यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. गोपीनाथ मुंडे ज्या निर्भयपणे राजकारणात वावरायाचे त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यांनी अनेक कार्यकर्ते नवीन निर्माण केले.