ठाणे- राष्ट्रवादीचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी आज ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी एकाच बाणात फडणवीसांचं कौतूक केलं तर शिंदेवर टिकास्त्र डागलं. राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या झोपडपट्टीवासियांना अडीच लाखात घर, या निर्णयाचे स्वागत करत जितेंद्र आव्हाडांनी फडणवीसांचं कौतुक केलं. तर, अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असताना त्या प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना इतक्या करामती करावी लागत आहेत, त्यामुळे मी खुश आहे,असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेवर टिकास्त्र डागलं.
फडणवीसांना आव्हाडांनी केली हि विनंती-
राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या झोपडपट्टीवासियांना अडीच लाखात घर, या निर्णयाचे स्वागत करत जितेंद्र आव्हाडांनी फडणवीसांचं कौतुक केलं. दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, घेतलेल्या निर्णयासाठी मी फडणवीस यांचे मी अभिनंदन करतो, हा जो निर्णय आहे तो चांगला आहे, पण यातून गोरगरिबांना न्याय देणारा आहे का ? आम्ही एक निर्णय घेतला होता की, एल.वाय मिळाल्यानंतर अडीच वर्षांनी त्यांना ते घर विकता आले पाहिजे. तो निर्णय त्यांनी घ्यावा,कारण झोपडपट्टीला एल.वाय दिल्यानंतर कधी विकसित होईल याचे काही वय वर्ष नसते. त्यामुळेच गरीब माणसाला झोपडी ही आजारात कामी येते, लग्नात कामी येते, झोपडी हे त्याचं धन आहे. जर एल.वाय दिला आणि तिथे बिल्डिंग बनायला जर तीस वर्षे लागत असतील तर त्याची तीस वर्षे वाया जातात. त्यामुळे, देवेंद्रजींना माझी विनंती आहे की त्यांनी हा निर्णय घ्यावा.
ठाण्यातील नालेसफाईवर जितेंद्र आव्हाडांचं सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र-
ठाण्यातील नालेसफाईवर जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र डागलं.यावेळी बोलताना, ‘नालेसफाई आणि कचरा ठाणे महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे खाण्याचे पुरण आहे. ते कचराही खातात आणि नाल्यातून पैसेही खातात.नालेसफाईचे टेंडर साधारण मार्च-एप्रिलमध्ये निघायला हवे आणि मेच्या एक तारखेला काम सुरू व्हायला हवे. पण, हे वाट बघत असतात की पाऊस कधी येईल, दरवर्षी ठाण्यात ठिक ठिकाणी पाणी साचते आणि दुर्घटना घडते , यातून ठाणेकरांची सुटका झालेलीच नाही आहे. आयुक्तांनी काय काम करावे, जर हे हेच सांगत असतील तर काय अपेक्षा करणार, मुंब्रा कळव्यातील नाल्यांचा तळ कुठल्याही अधिकाऱ्याने आजपर्यंत बघितला असेल तर त्यांनी मला येऊन सांगावे नालेसफाई हा निव्वळ पैसे खाण्याचा धंदा आहे.
अनंत करमुसे मारहाण चारशीट प्रकरण
कोरोना काळात अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी, ‘अनंत करमुसे प्रकरण मुख्य न्यायालयाने नाकारल्यानंतर तो माणूस सर्वोच्च न्यायालयात गेला, सर्वोच्च न्यायालयात त्याचे वकील कोण कोण होते यांची यादी काढा, मग तुम्हाला समजेल हा पैसा कुठून आला, जो अधिकारी चौकशी करत होता त्या अधिकाऱ्याची पोस्टिंग कुठे कुठे होते ते बघा, म्हणजे एका राजकीय पक्षाच्या ताटाखालचं मांजर असलेला अधिकारी चौकशी करत होता, आत्तापर्यंत ४ चारशीट झाल्या, त्याने अनेक वेळा अनेक कागदपत्रे दिली, आश्चर्याची गोष्ट म्हणजे काल एक मेडिकल सर्टिफिकेट बघितले. ते आता अचानक आले,२०२० मधले मेडिकल सर्टिफिकेट आता अचानक समोर आले, मग एवढ्या दिवस कुठे होते हे मेडिकल सर्टिफिकेट, उच्च न्यायालयात ते का नाही दाखवले, त्यांनी ते कुठेच दाखवले नाही. आमचे जे ताटाखालचे मांजर आहेत त्यांनी ते लावलंय, म्हणून अशा केसेसला फार महत्त्व द्यायचे नसते. त्यामुळे मुख्यमंत्री पण कामाला लागतात, मुख्यमंत्र्यांना मला संपवण्यासाठी इतकी करामती करावी लागत आहेत. त्यामुळे मी खुश आहे, मला ते फसवण्याचे १०० प्रयत्न करतील, पण मी गप्प बसणाऱ्यातला माणूस नाही,ज्या कोर्टाने सांगितले आहे की एकनाथ शिंदे यांची निवड अवैद्य आहे,स्पीकरने घेतलेला निर्णय चुकीचा आहे,त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकारच नाही, एवढे सर्व स्पष्ट असताना सर्व अवैध असताना या सरकारवर आता काय चर्चा करायची,नैतिकता फक्त उद्धव ठाकरेंकडे होती, असं मत व्यक्त केलं आहे.