मुंबई- ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीने मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला. शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे शिंदे-फडणवीस युतीत आलबेल नसल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. शिंदे गटाने केलेल्या या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र असल्यानेही आरोप प्रत्यारोप झाले. राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना दिलेल्या या जाहिरातीमुळे जनमाणसांत राज्य सरकारविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याकरता आज शिंदे गटाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही त्यांनी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना जाहिरात देऊन ‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीला ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या जाहिरातीने उत्तरार्ध केला आहे.
महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमान पत्रांमध्ये मंगळवारी (१३ जून) शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीला ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असं शीर्षक देण्यात आलं होतं. या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकीसंदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचं सांगण्यात आलं. तसेच अलिकडच्या काळात शिवसेना आणि भाजपात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रसिद्ध केलेली ही जाहिरात म्हणजे शिंदे गटाचं दबाव तंत्र असल्याचं बोललं जात आहे.
या जाहिरात प्रकरणावरून दिवसभर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या नेत्यांनी जाहिरातीमधील दाव्याचं समर्थन केलं. तर, भाजपाकडून या जाहिरातीला उघड विरोध करण्यात आला. तसंच, या जाहिरातीवर बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटो नसल्याने शिंदे गटाकडून दबावतंत्र वापरलं गेलं असल्याचं बोललं गेलं. दरम्यान, काल रात्री उशिरा शंभूराज देसाई यांनी या जाहिरातीबाबत मोठा खुलासा केला. ‘आजच्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीचा शिवसेनेशी (शिंदे गट) काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हितचिंतकांनी ही जाहिरात दिली असावी’, असं स्पष्टीकरण देसाई यांनी दिलं.
आज डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न
‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून मोठा वादंग निर्माण झाल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्याकरता आज पुन्हा अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’च्या जाहिरातीच्या माध्यमातून भाजपा-शिवसेना या डबल इंजिन सरकारच्या लोकप्रियतेचा पाढा वाचण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर लोकप्रियतेच्या बाबतीत विरोधकांना मिळालेली टक्केवारीही यातून देण्यात आली आहे.
जनतेचा शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्त्वाला ४९.३ टक्के आशीर्वाद तर, प्रमुख विरोधक २६.८ टक्के आणि अन्यांना २३.९ टक्के पसंती मिळाल्याचे या जाहिरातीत नमूद आहे. देशाच्या विकासाची दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला ८४ टक्के नागरिकांची पसंती; डबल इंजिन सरकारमुळेच राज्याच्या विकासाला गती येत असल्याचे ६२ टक्के नागरिकांचे मत; ४६.४ नागरिकांची भाजपा-शिवसेनेला पसंती, प्रमुख विरोधक ३४.६ टक्के, अन्य १९ टक्के; अशीही माहिती या जाहिरातीतून देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचे फोटो
या जाहिरातीतील विशेष आकर्षण म्हणजे शिवसेनेच्या नऊही मंत्र्यांचे फोटो खाली छापण्यात आले आहेत. तर, जाहिरातीच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचेही फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे फोटो न लावल्यामुळे झालेल्या डॅमेजला कंट्रोल करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.