हम करें राष्ट्र आराधन…

Spread the love

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख. – योगेश मुळे.

भारतीय लोकशाहीचा वैभवशाली इतिहास रामायण-महाभारत काळापासून ज्ञात आहे.सारे जग सामाजिकीकरणाच्या अंधःकारात चाचपडत असताना भारत सुवर्णयुग अनुभवत होता. राजा आणि प्रजा धर्मपरायण आणि कर्तव्यपरायण होते. पुढे प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात आर्यावर्तानेअनेक चढउतार पाहिले. मुघल आणि इंग्रजांनी भारताचे सर्व बाजूंनी केलेले शोषण आणि त्यानंतर निर्माण झालेली विदारक अवस्था भारतीय जनसामान्यांनी पुरेपूर अनुभवली. अनेक राष्ट्रपुरुषांचा असिम त्याग, अनेकांचा पुरुषार्थ, अनेकांचा सहयोग हेच भारतीय स्वातंत्र्याचे स्तंभ होते. पुढे नाईलाजाने इंग्रज गेले खरे पण त्यांना जे घेऊन जाता आलं नाही तेवढ्याच गोष्टी ईथे सोडून गेले आणि त्यामुळे भारतीय तळमळ चळवळीपुरती मर्यादित राहिली. स्वातंत्र्योत्तर काळात महापुरुषांची आणि तत्त्ववेत्यांची कमी नव्हती; कमी होती एकाच गोष्टीची… चैतन्याची; प्रेरणेची; तेजाची. अनेकजण या गोष्टीच्या आसपास होते. मात्र लोकांना देण्यात ते निश्चित कमी पडले.

याच दरम्यान गुजरातच्या क्षितिजावर एक तेजस्वी योगी अवतरला. या योग्याने ‘राष्ट्राय स्वाहा’ म्हणत चक्क आपलं उभं आयुष्य भारतमातेला समर्पित केलं. महात्मा गांधींच्या भूमीतून आलेला हा योगी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वैचारिक अनुयायी होता ही गोष्ट विशेषत्त्वाने नमूद करणे गरजेचे आहे. एखाद्या प्रबुद्ध योग्याला राजयोग लाभला तर तो काय करेल असे कोणी विचारले तर त्याला दाखवा – राष्ट्रयोगी पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी.

सामाजिक क्षेत्रांत कार्यरत झाल्यानंतर व्यक्तिगत भाव आणि भावनांचा त्याग करावा लागतो ही शिकवण देणारी व्यक्ती म्हणजे श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या भूमीत कधीकाळी महाभारतात ‘धर्मो हिंसा तथैव च’ असे सांगणारा भगवान श्रीकृष्ण होऊन गेला याची शत्रूला वेळोवेळी आठवण करून देणारी व्यक्ती म्हणजे श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी. काश्मीरमध्ये स्वतः जाऊन तिरंगा फडकवला हा झाला इतिहास; पण आपल्या दुर्दैवाने ज्याच्या पूर्वजांची कधीच हिंमत झाली नाही अशा राहुल गांधींनाही काश्मीरमध्ये अभिमानाने आणि गर्वाने तिरंगा फडकवता आला याचे श्रेयही श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी यांनाच.

भारतीय संस्कृतीची जगाला नव्याने ओळख करून देणारे; ओळख करून देण्यासोबत भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून सांगणारे आणि कित्येकांना आपले अनुयायी (आजच्या भाषेत Fan किंवा Follower म्हणू) होण्यासाठी प्रेमाने प्रवृत्त करणारे हे दुसरे नरेंद्र. पहिल्या नरेंद्रने म्हणजेच स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील धर्मसभेत दिग्विजयी भाषण केले होते. प्रभू श्रीरामरायासाठी सेवक मारूतीरायाने सर्व काही केले आज तेच काम देशाचा प्रधानसेवक श्रीरामरूपी जनतेसाठी करण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवरायांचे अनुयायी म्हणून महिला सुरक्षा आणि महिला सशक्तीकरण धोरणावर भर देणारे मा. पंतप्रधान माँसाहेब जिजाऊंचा सहकाराचा वारसा जनतेसाठी पुढे चालवणारे जगातील विद्यमान देशांच्या नेत्यांमध्ये अग्रणी आहेत.

राष्ट्रीय मानबिंदूंकडे पहाण्याची नवी दृष्टी देणारे, राज्यघटनेचे सर्वार्थाने पालनकर्ते आणि राष्ट्रीय सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व देणारे मोदीजी उद्यमशील विचारांना, विज्ञान आणि तंत्रज्ञानाला, कृषी क्षेत्राला आणि पायाभूत सुविधांना एवढ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात यशस्वी झालेत की आता सर्वसामान्य नागरिक त्यांचा हक्काचा झाला आहे. विरोधकांच्या पोटात दुखणे, मळमळ होणे, गरगरणे हे सर्व त्याचेच साईड इफेक्ट्स आहेत. देशाचा प्रधान १८ तास काम करतो हे कोणाच्या पचनी कसे पडेल? आणि हे अपचनच सर्व रोगांचे, व्याधींचे मूळ कारण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रखर राष्ट्रवादी आहेत; राष्ट्रहितैषी आहेत; राष्ट्रगौरव नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी द्रष्टे आहेत; विचारक आहेत आणि कृतीशील कार्यकर्ते आहेत. ते उत्तम वक्ते, लेखक आणि कवीही आहेत. त्यांचे आजवरचे आयुष्य प्रेरणापुंज आहे. कोणीही वाचा आणि हवी तेवढी प्रेरणा आणि हवी तेवढी सकारात्मक ऊर्जा घ्या. राजकीय, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी, पायाभूत सुरक्षा, राष्ट्रीय अशा कोणत्याही विषयाचा अभ्यास पूर्णत्वास न्यायचा असेल तर मोदीजींचे चरित्र अभ्यासावे लागेल. So, Now onwards Modiji is the benchmark for every sensitive human being.

भारतमातेचे थोर सुपुत्र, १३ राष्ट्रांचा सर्वोच्च सन्मान प्राप्त असलेले विश्वनेते, संस्कृतीसंवर्धक, लोकहितवादी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना ७३ व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आई महालक्ष्मी अंबाबाईची कृपा आपणास अखंड निरामय आयुष्य प्रदान करेलच. २०२४ साठी सगळे भारतीय सज्ज आहेत. आपण सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान म्हणून संसदेत स्थानापन्न व्हाल यात कोणतीही शंका नाही. आपल्या राष्ट्रसेवेस विनम्रतापूर्वक वंदन ! जय हिंद !!          

अन्तर से, मुख से, कृति से

निश्छल हो निर्मल मति से

श्रद्धा से मस्तक नत से

हम करें राष्ट्र अभिवादन

हम करें राष्ट्र आराधन ||

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page