
सांगली- सांगली लोकसभा मतदारसंघात मविआ आणि महायुतीच्या वतीने आपले उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात दुहेरी लढत होईल, हे चित्र अगदी स्पष्ट आहे. परंतु ठाकरे गटाच्या वतीने महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कॉंग्रेस पदाधिकारी व इच्छुक उमेदवार विशाल पाटील प्रचंड नाराज झालेले आहेत.
त्यांनी जर बंड केले किंवा वंचितशी हातमिळवणी करून लोकसभेच्या मैदानात उतरले तर त्याचा थेट फायदा हा महायुतीचे भाजप उमेदवार संजय काका पाटील यांना होणार आहे. त्यामुळे वेळप्रसंगी सांगलीत तिहेरी लढत देखील होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण सद्यातरी विशाल पाटील यांनी कोणतीही ठाम भूमिका न घेतल्याने संजय काका पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चला तर जाणून घेऊ, सांगली लोकसभा मतदारसंघाविषयी…!
सांगली मतदारसंघाचा इतिहास?…
1962 ते 2014 पर्यंत या मतदारसंघातून नेहमी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. वसंतदादाचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा नेतृत्व केलं. त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील 2006ला झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 2009ला प्रतीक पाटील यांनी पुन्हा विजय मिळवला. पण 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयकाका पाटील यांनी ऐन लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या मोदी लाटेत संजयकाका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. त्यानंतर काँग्रेस–राष्ट्रवादीने सांगलीमध्ये जिल्हापरिषद, महापालिका, पंचायत समित्या, नगरपरिषदा, महापालिका अशी सत्ताकेंद्रे एकापाठोपाठ एक गमावली.
2019 च्या निवडणुकीत काय घडलं होतं?….
सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेते आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि मदन पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जिल्ह्यातलं छत्रच हरपलं. 2019 च्या निवडणुकीच्या आधी प्रतीक पाटील यांनीही पक्षाचा राजीनामा दिला. मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे. काँग्रेस पक्षाशी माझं नातं संपलं आहे,” अशी घोषणा प्रतीक पाटील यांनी सांगलीतील एका मेळाव्यात बोलताना केली होती. निवडणुकीच्या अगदी दोन महिने आधी काँग्रेसमध्ये लढायलाच कोणी नव्हते अशी स्थिती होती. कदम आणि पाटील घराण्याबाहेरच्या उमेदवाराचा विचारही काँग्रेसने केला नव्हता. शेवटी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली. यावेळी स्वाभिमानीने काँग्रेसमधल्याच विशाल पाटलांना आयात करत त्यांना उमेदवारी दिली. विशाल पाटील म्हणजे वसंत दादांचे नातू. त्यांची जिल्ह्यात तशी चांगलीच ताकद आहे.

त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला रंग चढलाच होता, मात्र निवडणूक ऐन रंगात आली ती गोपीचंद पडळकर यांच्या एन्ट्रीने. पडळकर सुरुवातीला काँग्रेस – स्वाभिमानीकडून रिंगणात उतरणार होते. मात्र, ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळवली आणि जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उठवला. आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी घेतलेल्या सांगलीतील सभेत मिळालेला प्रतिसाद पाहता पडळकरांना चांगली मतं मिळणार असा कयास बांधला जात होता. मात्र, पडळकरांना तिसर्या क्रमांकाची मतं मिळाली आणि याचा फटका बसला आघाडीच्या उमेदवाराला. परिणामी भाजपने हा अटीतटीचा सामना संजय काका पाटलांच्या रूपाने जिंकला.
कोल्हापूरच्या जागी सांगलीची जागा…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आज (27 मार्च) घोषणा केली. 17 जागांसाठी शिवसेनेनं आपले उमेदवार जाहीर केली. शिवसेनेच्या उमेदवार यादीतील काही जागांवरून महाविकास आघाडीमधील नाराजीही समोर आली. यांपैकी एक जागा आहे सांगलीची. सांगलीमधून शिवसेनेनं महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. पण काँग्रेसने या जागेवरचा आपला दावा अजूनही सोडलेला नाही. कोल्हापूरच्या बदल्यात आम्ही सांगली लढवत आहोत, हा शिवसेनेचा दावा आहे; तर वाटाघाटीत असं ठरलं नसल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. पण आता अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला ही जागा गेली.
विशाल पाटील यांच्यासह काही पदाधिकारी यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे विशाल पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विशाल पाटील यांच्यासह काही पदाधिकारी यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे विशाल पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर नाराजीचा फायदा महायुतीला होणार?
अखेर या जागेचा निकाल लागला आहे. सांगलीची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेली आहे. सांगलीतून उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील उमेदवार असणार आहेत. फक्त आता ग्राऊंड लेव्हलवर त्यांना काँग्रेसकडून कसं सहकार्य मिळतं, त्यावर बरच काही अवलंबून आहे. सांगली जिल्ह्यातून सध्या भाजपाचे संजय काका पाटील खासदार आहेत. मागच्या दोन टर्मपासून तेच खासदार आहेत. मोदींचा पराभूत करण हेच लक्ष्य आहे, असं मविआमधले नेते सांगतायत. पण स्थानिक पातळीवरील या नाराजीचा महायुतीला फायदा होऊ शकतो.
परस्पर उमेदवार जाहीर केल्याने वाद..
सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने वातावरण तापलं होतं. ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. प्रत्यक्षात इथे ग्राऊंड लेव्हलवर काँग्रेसची ताकद आहे. सांगली जिल्ह्यात पंचायत समित्यांपासून जिल्हा परिषदेत काँग्रेसची ताकद आहे. काँग्रेसचे आमदार या जिल्ह्यात आहेत. सहकाराच मोठ जाळ काँग्रेसने इथे उभारलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेते विश्वजीत कदम, विशाल पाटील नाराज झाले. त्यांनी दिल्लीला जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतली. संजय राऊत नुकतेच तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि त्यांच्यामध्ये शाब्दीक कलगीतुरा रंगला होता.

विशाल पाटलांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष?…
सांगली लोकसभा मतदारसंघ जागावाटपात ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने विशाल पाटील व विश्वजीत कदम प्रचंड नाराज झालेले आहेत. आता विशाल पाटील काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मविआच्या पत्रकार परिषदेनंतर विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी देखील माध्यमांशी बोलताना जागाबदल करावी, अशी भूमिका मांडली. दरम्यान, विशाल पाटील यांनी अकोलामध्ये जाऊ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे आता विशाल पाटील सांगलीतून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार का, का वंचितसोबत जाऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उद्धवजी फेरविचार करा, कदमांची विनंती…
काँग्रेसचे नेते, आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांसह जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील, महेंद्र लाड, जितेश कदम यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. जागावाटप चर्चा चालू झाल्यापासून आम्ही सर्वजण काँग्रेसला सांगलीची जागा मिळावी यासाठी आग्रही होतो, वरिष्ठांकडे भावना पोहोचवल्या. सांगलीची जागा ही काँग्रेसला लढायला मिळावी, काँग्रेस त्याला सक्षम आहे या भावना आम्ही वरिष्ठांकडे पोहोचवल्या. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण सांगलीचा जो इतिहास आहे तो समजून घेऊन उमेदवारी झाली असती, तर आज जी परिस्थिती आहे ती निर्माण झाली नसती. आजही आमची मविआमधील सर्व नेत्यांना विनंती की सांगलीची परिस्थिती पाहून उमेदवारी बाबत फेरविचार करावा. महाविकास आघाडीला सत्य परिस्थितीची माहिती घेऊन ,पुन्हा फेरविचार करावा, ही महाविकास आघाडीला आमची विनंती आहे, असे विश्वजित कदम यांनी केली.