अनेक लोकांना वजन कमी करताना जास्त प्रमाणात सॅलेडच खायला सांगितले जाईल असे वाटते. वजन कमी करताना जास्त प्रमाणात सॅलेड खाणे चुकीचे आहे. सॅलेड मध्ये फायबर्स, खनिजे (मिनरल्स) व मायक्रो मिनरल्स असतात. सॅलेड मध्ये फॅटस कमी असतात. सॅलेड योग्य प्रमाणात खाल्ले तर योग्य परिणाम मिळतात पण जर जास्त प्रमाणात खाल्ले तर गॅसेस होऊ शकतात किंवा पोटात बिघाड होऊ शकतो. जास्त प्रमाणात सॅलेड खाल्ल्यामुळे वजन चुकीच्या पद्धतीने कमी होते व चांगली पोषणमुल्य शरीरात शोषली जात नाहीत. आयुष्यभर जेवणा ऐवजी सॅलेड खाणे अवघड आहे, ते शरीराला मानवणार नाही आणि पोषणमुल्यांची (विटामिन, खनिज इ.) कमतरता निर्माण होऊ शकते. पोषणमुल्यांची (विटामिन, खनिज इ.) कमतरता आरोग्यास घातक आहे व जास्त प्रमाणात सॅलेड खाऊन कमी केलेले वजन परत वाढू शकते.
रोजच्या आहारात फायबर्स हे ३०-४० ग्राम ची आवश्यकता असते. लोकं सॅलेड मध्ये जास्त फायबर्स असतात म्हणून खातात. पण फायबर्स हे गहू, ज्वारी, फळे व भाज्यांमध्ये सुध्दा असतात. ब्राऊन राईस मध्ये जास्त फायबर्स असतात पण तो शिजायला व पचायला अवघड असतो म्हणून ब्राऊन राईस खाणे टाळावे. जास्त प्रमाणात सॅलेड खाण्याचा सल्ला त्यांनाच दिला जातो ज्यांना पोट साफ न होण्याचा त्रास आहे किंवा मधुमेह आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांना जास्त फायबर्स असलेले पदार्थ खायला सांगितले जाते कारण फायबर्समुळे रक्तातील साखर कमी वेगाने वाढते. आहारात योग्य प्रमाणात फायबर्स असतील तर काही आजार बरे व्हायला मदत होते जसे की पोटाशी संबंधित आजार किंवा कॅन्सर, मधुमेह व लठ्ठपणा. तसेच चांगले कोलेस्टेरोल वाढायला व वाईट कोलेस्टेरोल कमी करायला पण मदत होते.
सॅलेड मधून फायबर्स मिळतात जे आरोग्यास चांगले असतात पण रोजच्या आहारात त्याचे प्रमाण मर्यादित असणे गरजेचे आहे. इंटरनेट वर अनेक प्रकारची सॅलेडस कशी करायची हे शिकता येईल व सॅलेड/कोशिंबीर खायचा कंटाळा येणार नाही. सॅलेड म्हणजे फक्त गाजर आणि काकडी नाही. सॅलेड/कोशिंबीर करताना अनेक प्रकारच्या भाज्या/फळ वापरू शकता जसे कि टोमॅटो, काकडी, गाजर, बीट, मुळा, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, कडधान्य, मक्याचे दाणे, डाळिंबाचे दाणे, पनीर इत्यादी. वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या किंवा फळे वापरून सॅलेड बनवता येऊ शकते. तसेच मुलांना पण सॅलेड बनवायला शिकवू शकता. जेव्हा सुकी भाजी असेल तेव्हा कोशिंबीर करावी व जेव्हा रस्सा भाजी असेल तेव्हा सॅलेड खावे. सॅलेड करताना तुकडे करावेत किंवा किसावे किंवा सॅलेड वर लिंबू पिळावे किंवा सैंधव मीठ वापरावे. मुलांना पहिल्यापासून सॅलेड/कोशिंबीर खायची सवय लावणे आवश्यक आहे.