भुज, गुजरात : केंद्रात सरकार आल्यानंतर भाजपकडून आक्रमकपणे हिंदुत्ववादी भूमिका घेणे सुरू झाले. मागील काही वर्षात संघ परिवारातील काही संघटना, भाजपचे काही नेते आणि इतर उजव्या संघटनांकडून हिंदू राष्ट्राची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतात हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता नाही. भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक गुजरातमधील भूजमध्ये पार पडली. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, भारतात हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता नाही. भारत हिंदू राष्ट्र आहेच असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केले आहे. भारत हिंदू राष्ट्र केव्हा बनणार या पत्रकारांच्या प्रश्नाचा उत्तर देताना होसबळे यांनी भारत हिंदू राष्ट्र आधीही होता, आजही आहे आणि नेहमीच राहणार असे मत व्यक्त केले.
यावेळी होसबळे यांनी आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार यांच्या एका ऐतिहासिक वक्तव्याचा उदाहरणही दिले. हेडगेवार म्हणाले होते मी हिंदू आहे असे म्हणणारा एकही व्यक्ती जोवर या भूमीवर आहे, तोवर भारत हिंदू राष्ट्र राहणार.
यावेळी आपल्या उत्तरात आणखी स्पष्टता आणण्यासाठी होसबळे यांनी संविधानानुसार असलेली राज्यपद्धती म्हणजेच स्टेट सिस्टम आणि राष्ट्र ( नेशन ) यांच्यामध्ये काय फरक आहे, हेही खुलासेवार सांगितले. भारतावर जेव्हा इंग्रजांचे राज्य होते, तेव्हा ते ब्रिटिश राज होते. मात्र तेव्हाही राष्ट्र म्हणून भारत हिंदू राष्ट्रच होता असे होसबळे म्हणाले. आपला देश, समाज, संस्कृती, धर्म यासाठी काहीतरी चांगलं करण्याची भावना असणे हेच हिंदुत्व आहे आणि याच हिंदुत्वाची जाणीव व्हावी यासाठी संघ कार्य करत आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याची गरज नसून भारत हिंदू राष्ट्रच आहे असा पुनरुच्चार होसबळे यांनी केला.
हिंदुस्थान हिंदू राष्ट्र, हे सत्य आहे आणि आरएसएस हे करणार : सरसंघचालक
हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे,आणि हे सत्य आहे आणि आरएसएस हे करणार. वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत, काही लोकांना समजले आहे आणि काही लोक समजल्यानंतरही अनभिज्ञ आहेत,” असं वक्तव्य सप्टेंबर महिन्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. “हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे, हे सत्य आहे, आरएसएस हे नक्की करेल, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे, यात काही आक्षेप नाही पण सर्व भारतीयांची काळजी करा, वैचारिकदृष्ट्या सर्व भारतीय हिंदू आहेत,” असं भागवत यांनी त्यावेळी म्हटले.