देवरुखच्या विलास रहाटे व सागर जाधव यांची चमकदार कामगिरी.

२. मूकनाट्य स्पर्धेचे मान्यवरांकडून बक्षीस स्वीकारताना मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी.
गणपत विद्यापीठ, मेहसाणा, गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या ३६ व्या भारतीय पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात (सतरंग) मुंबई विद्यापीठाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपदाचा सन्मान प्राप्त करून गत अनेक वर्षांची परंपरा कायम राखली आहे. या स्पर्धेमध्ये आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुखचा विद्यार्थी सागर जाधव व माजी विद्यार्थी विलास रहाटे यांनी आपल्या चमकदार कामगिरीने या सर्वसाधारण विजेतेपदासाठी हातभार लावला. सागर आणि विलास यांना मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांचे अनमोल मार्गदर्शन व सहाय्य लाभत आहे.
महाविद्यालयाच्या सागर प्रदीप जाधव (तृतीय वर्ष, कला) याचा समावेशअसलेल्या मूकनाट्य (माईम) या नाट्यप्रकारास द्वितीय क्रमांक प्राप्त होऊन विद्यापीठाला रौप्य पदकाचा सन्मान मिळाला. या स्पर्धेत ‘ट्रॅप ऑफ लाईफ’ या विषयावरील मानव व प्राणी यांच्या भावभावनांची संबंधित मूकनाट्य विद्यार्थ्यांनी सादर करून हे यश प्राप्त केले. या मूकनाट्य प्रकारासाठी महेश खाप्रेकर, सागर चव्हाण, आशिष पवार आणि अभय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी मुंबई विद्यापीठाच्या फाईन आर्ट संघाला केशर चोपडेकर यांच्यासह प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. या मुंबई विद्यापीठाच्या संघाने फाईन आर्ट कला प्रकाराचे सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करताना चार सुवर्ण आणि दोन रौप्य पदके प्राप्त केली. या मुंबई विद्यापीठाच्या संघात गणेश सोन्ने, अक्षय वहाळकर आणि आकाश काळे यांचा समावेश आहे.
विलास रहाटे व सागर जाधव यांना बेंगलोर येथे होणाऱ्या भारतीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, कला शिक्षक सुरज मोहिते, सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. वर्षा फाटक, प्रा. धनंजय दळवी आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापक इतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.