
*मुंबई :* मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ७ बांगलादेशी महिलांनी अनेक मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला आहे. त्यांनी एचआयव्हीची बाधा असताना देखील मुंबईतील अनेक पुरुषांशी संबंध ठेवले. याबाबतचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे. या सात महिलांमुळे अनेकांना एचआयव्हीची बाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी अलीकडेच विविध ठिकाणी छापेमारी करत वेश्याव्यवसायात गुंतलेल्या १४ बांगलादेशी महिलांची सुटका केली. या महिलांची एचआयव्ही टेस्ट केली असता १४ पैकी ७ महिलांना एचआयव्हीची लागण झाल्याची बाब वैद्यकीय तपासणीतून समोर आली आहे. बांगलादेशातून या महिलांना चांगल्या पगाराचे आमिष दाखवून भारतात आणण्यात आले. त्यांना मुंबईसह वेगवेगळ्या शहरात पाठवून त्यांच्याकडून देहविक्रय करवून घेतला जात असल्याचे तपासत उघड झाले आहे.
परिमंडळ ११ च्या पोलीस पथकाने मागील आठवड्यात छापा टाकून देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला. बांगलादेशातून गरजू महिलांना भारतात नोकरीच्या आमिषाने आणले जात होते. वेगवेगळ्या दलालांमार्फत त्यांना मुंबईतील कुंटणखान्यात, विविध लॉजमध्ये पाठवून देहविक्री करण्यास भाग पाडण्यात येत होते. या महिलांना मासिक ४० ते ५० हजार रुपये पगार दिला जात होता.
पोलिसांच्या विशेष पथकाने मालवणी, तसेच अन्य परिसरात कारवाई करून या देहविक्रय करणाऱ्या १४ महिलांची सुटका केली. यातील ७ महिलांना एचआयव्हीची लागण असल्याचं आढळून आलं. सध्या या महिलांची रवानगी शासकीय सुधारगृहात करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना बांगलादेशात पाठवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांच्या विशेष पथकाने आतापर्यंत या प्रकरणात एकूण ८ जणांना अटक केली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार फारूख नावाचा बांगलादेशी नागरिक आहे. त्याने पश्चिम बंगाल येथे आपले दलाल तयार केले होते. तो बांगलादेशातील १९ ते ३० वर्ष वयोगटातील गरजू तरुणींना हेरायचा, त्यांना महिन्याला ४० ते ५० हजार रुपयांची नोकरी मिळेल, असं आमिष दाखवून भारतात आणायचा. त्यानंतर या महिलांना तो वेगवेगळ्या दलालांकडे पाठवायचा. हे दलाल मुंबईतील भाड्याने घेतलेल्या घरात या तरुणींना ठेवून त्यांच्याकडून मासिक वेतनावर देहव्यापार करून घेतला जात होता.