इंग्लंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय.
पहिल्याच महिला U-१९ टी-२० विश्वचषकावर कोरले नाव…
✒️ जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 सेनवेस पार्क | जानेवारी २९, २०२३.
▪️ भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी रविवारचा (दि. २९ जानेवारी) दिवस खूपच महत्त्वाचा ठरला. १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला त्यात टीम इंडियाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत अंडर-१९ विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली.
▪️ कर्णधार शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिल्या-वहिल्या १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषकाचा किताब पटकाण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो गोलंदाजांनी सार्थ ठरवत इंग्लंडला ६८ धावांवर सर्वबाद केले. तीतस साधूला सामनाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
▪️ इंग्लंडने ठेवलेल्या केवळ ६९ धावांचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली मात्र १६ धावांवर कर्णधार शेफाली वर्माला १५ (११) हन्ना बेकरने अलेक्सा स्टोनहाउसकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ सलामीवीर श्वेता देखील केवळ ५(६) धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेल्या सौम्या तिवारी आणि त्रिशा गोंगडी यांच्यात ४६ धावांची भागीदारी झाली. मात्र २४(२९) करून त्रिशा बाद झाली. सौम्याने ३७ चेंडूत २४ धावा करून पहिल्यावहिल्या अंडर-१९ विश्वचषकात पहिला-वहिला विजय मिळवून दिला.