नवीन तालुका निर्मितीसाठी प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांची रायपाटणसह पाचलमध्ये सभा
राजापूर / प्रतिनिधी – रायपाटण हे ऐतिहासिक गाव असून त्याला मोठा वारसा लाभला आहे. यापूर्वी शासनाच्या धोरणा नुसार ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावांचा तालुक्यासह जिल्ह्याच्या मुख्यालयासाठी जसा विचार झाला तशाच प्रकारे शासनाने रायपाटण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून या इतिहासाकालीन गावाचा सन्मान वाढवावा अशी आग्रहाची मागणी समस्त रायपाटणवासियांकडून राजापूरच्या प्रांताधिकारी डॉ जॅसमिन यांच्याकडे करण्यात आली.सदर बैठकीत दर्जेदार सादरीकरण करून रायपाटण येथे उपलब्ध असलेल्या विद्यमान विविध सुविधा.. स्वतंत्र रायपाटण तालुका निर्मितीनंतर शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक असलेली मुबलक प्रमाणातील शासकीय आणि खाजगी जमीनी यावर प्रामुख्याने अधिक भर देण्यात आला. रायपाटणवासियांच्या भावना जाणून घेतल्यानंतर प्रांताधिकारी डॉ जॅसमिन यांनी याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल असे स्पष्ट केले.
रायपाटण ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या विशेष बैठकीला राजापूरच्या उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी )डॉ जॅसमिन, तहसीलदार विकास गंबरे, रायपाटनचे सरपंच निलेश चांदे उपसरपंच विजय जडयार सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आमकर, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी रायपाटनचे माजी सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
राजापूर तालुक्यात नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्यात येणार असून त्यासाठी रायपाटण ग्रामपंचायतच्या माध्यमातून यापूर्वी तसा मागणीचा परीपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने प्रांताधिकारी डॉ जॅसमिन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रायपाटण ग्रामपंचायत मध्ये विशेष बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये अप्पर तहसील कार्यालया साठी रायपाटण ग्रामपंचायत कार्यक्षेत्र कसे योग्य आहे ते पटवून देण्यात आले. रायपाटण चे माजी सरपंच संदीप कोलते, जिजामाता विद्यामंदिर रायपाटणचे माजी मुख्याध्यापक श्री विनोद करंदीकर,एमकेसीएल कॉम्पुटरचे संचालक आणि रायपाटण चे सुपुत्र संतोष कोलते यांनी रायपाटण गावातील उपलब्ध सुविधा.. आवश्यक असलेली मुबलक प्रमाणातील जमीनी यावर मुद्देसूद मांडणी केली.रायपाटणाचे माजी सरपंच संदीप कोलते यांनी राजापूर तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र रायपाटण तालुका निर्मिती शासनाने करावी यासाठी सन १९९० पासून कसे प्रयत्न सुरु आहेत त्याचा ओझरता आढावा घेतला. राज्य विधानसभेच्या अनेक अधिवेशन काळात विधानसभेसह विधान परीषदेच्या अनेक सदस्यांनी राजापूर तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र रायपाटण तालुका निर्मितीबाबत सभागृहातील विविध आयुधांचा वापर करून कशी मागणी केली होती. ते सांगताना त्याला तत्कालीन महसूल मंत्र्यांसह शासकीय स्तरावरून कशी उत्तरे दिली गेली त्याचे अवलोकन केले.रायपाटण तालुकानिर्मितीसाठी वेळोवेळी झालेले पत्रव्यवहार .. शासनाकडून मिळालेली उत्तरे… माहितीच्या अधिकाराखाली शासनाकडून उपलब्ध झालेली माहिती त्याच्या प्रती सादर केल्या.अप्पर तहसील कार्यालय रायपाटण येथेच व्हावे अशी त्यांनी जोरदार मागणी केली.
जिजामाता विद्यामंदिर रायपाटणचे माजी मुख्याध्यापक श्री विनोद करंदीकर यांनी रायपाटण गावचा इतिहासाचे ओझरते अवलोकन करताना इतिहास कालीण युगातील रायपाटणचे महत्व अधोरेखित करीत लक्ष वेधले. शासनाचे इतिहासकालीन गावांबाबत असलेले धोरण लक्षात घेऊन इतिहासाचा भक्कम वारसा असलेल्या रायपाटण गावात अप्पर तहसील कार्यालयाला शासनाने मंजुरी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तर एमके सी एल चे संचालक संतोष कोलते यांनी रायपाटण गावातील उपलब्ध सुविधा याबाबत सादरीकरण करून लक्ष वेधले.
रायपाटण गावात शासकीय आणि खाजगी स्वरूपात मुबलक जमीनी आहेत हे देखील निदर्शनाला आणून देण्यात आले.समस्त रायपाटण वासी्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर आपण शासनाकडे अहवाल सादर करू अशी ग्वाही प्रांताधिकारी डॉ जॅसमिन यांनी उपस्थित रायपाटण वासि्यांना दिली. त्यानंतर रायपाटण परीसरातील काही ठिकाणाची पाहणी करून त्या पाचलला रवाना झाल्या.पाचल ग्रामपंचायतच्यावतीने देखील अप्पर तहसील कार्यालय साठी मागणी करण्यात आल्याने पाचल मध्येही बैठक पार पडली.