मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या निमित्ताने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज म्हणजेच २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव संपेपर्यंत महामार्गावरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खड्डे मुक्त करण्यासाठी सध्या मुंबई-गोवा महामार्गावरचं काम जलदगतीने सुरू आहे, त्यामुळे अवजड वाहतूक बंद केली आहे. यासाठी वाहन चालकांनी पर्यायी महामार्गाचा वापर करावा, असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. रवींद्र चव्हाण यांनी आजच मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली. अवजड वाहनांच्या कोंडीमुळे कामाला विलंब होत आहे, त्यामुळे अवजड वाहनांनी खालापूरच्या पर्यायी मार्गाने नेण्यात यावं, असे निर्देश दिले आहेत. रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असेल, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
मनसेचं आंदोलन
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात टोलनाक्यावर खळ्ळ खटॅक आंदोलन केलं होतं, यानंतर या प्रश्नी मनसे नेते अमित ठाकरे आज (रविवारी) जागर यात्रा काढणार आहेत.गेली अनेक वर्षानंतरही मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नाही, खड्डेमय रस्त्यावरून चाकरमान्यांना प्रवास करावा लागतोय, याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी संताप व्यक्त केला होता. मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जागर यात्रा काढण्यात येणार आहे.सरकारला जागं करण्यासाठी ही यात्रा असल्याचं मनसे नेते सांगत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे या यात्रेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत.