अहमदनगरला तासभर मुसळधार अवकाळी पाऊस

Spread the love

अहमदनगर :- यंदा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही. गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकांना शुक्रवारी पुन्हा पावसाने झोडपले. नगर शहर, तालुका व जिल्ह्याच्या अनेक भागांत शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली.
महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी सूर्यदर्शनही झाले नाही. शिवाय थंड वारेही वाहत होते. त्यामुळे हमखास पाऊस पडेल, अशी स्थिती होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास नगर शहरासह नगर तालुका परिसरात तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली. शिवाय कुकाणा व जिल्ह्याच्या काही भागात हलक्या सरी बरसल्या.
मागील महिन्यात २६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून कसेबसे बचावलेल्या कांदा, गहू, तूर, मका व फळबागांचे आता पुन्हा नुकसान होणार आहे. अनेक भागात लाल कांदा काढणीच्या टप्प्यात असून तेथे या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. शिवाय गव्हाचे पीकही जोरदार वारे व टपोऱ्या थेंबांनी कोलमडण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाने प्रामुख्याने फळबागांचे मोठे नुकसान होणार आहे. ऐन थंडीत सर्वत्र धुक्यासह ढगाळ वातावरण झाल्याचा परिणाम आधीच पिकांवर झाला होता. त्यात अवकाळीने झोडपल्याने डाळिंब, द्राक्ष, मोसंबी उत्पादक शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत. याशिवाय आंब्याचा मोहरही झडल्याचे दिसत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page