
▶️विदर्भ- विदर्भ,मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. विदर्भातील नागपूर, बुलढाणा, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तर मराठवाड्यातही तब्बल दोन तास संततधार पाऊस बरसला. मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
▶️गेल्या तीन आठवड्यांपासून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. परंतु शुक्रवारी सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने झपाट्याने उष्णता कमी झाली. दुपारनंतर सोसाट्याचा वारा सुटून पावसाने हजेरी लावली. विदर्भातील अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. बुलढाण्यातील खामगाव आणि चिखली तालुक्यांमध्ये रिमझिम पावसाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरासह गंगापूर आणि पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.
▶️पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या अवकाळी पावसाने राज्यात पुन्हा हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.
▶️खामगावात वीज कोसळून ८ शेळ्यांचा मृत्यू
बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात वीज कोसळल्याने ८ बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खामगाव तालुक्यातली पळशी खुर्द या गावात ही घटना घडली असून चार शेतकऱ्यांच्या शेतात वीज पडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता बुलढाण्यात खळबळ उडाली असून या प्रकरणात शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. विदर्भातील आणि मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा आणि रब्बी पिकांची नासाडी झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसह गारपीटीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.