अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
*नवी दिल्ली :* अमेरिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. अनेक महिन्यांच्या राजकारणानंतर अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. अमेरिकेची महासत्ता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती आली आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा पराभव झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर देशभरातील प्रमुख नेत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. एक्सवर पोस्ट करुन नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प या माझ्या मित्राचे मनापासून अभिनंदन… तुमच्या ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळातील यशाचा आधार घेत असताना, मी भारत-यूएस व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आमच्या सहकार्याचे नूतनीकरण करण्यास उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया, अशा शुभेच्छा व अभिनंदन नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.
अमेरिकेची निवडणूक ही संपूर्ण देशभरामध्ये बहुचर्चित, बहुप्रतिक्षित अशी होती. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिक पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय वंशाच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यामध्ये लढत होती. ही लढत चुरशीची होणार होती. अमेरिकेमध्ये मतदानही सुरळीतपणे पार पडले. या निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी सायंकाळी साडेपाचपासून सुरुवात झाली होती. इतकेच नाहीतर काही राज्यांमध्ये आज सकाळपर्यंत मतदानही सुरू होते. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय घोषित झाला आहे.
*विजयानंतर व्यक्त केल्या भावना..*
डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, देशाला मजबूत करण्याची प्रतिज्ञा आम्ही घेतली आहे. आमचा देशामध्ये आता बदलाची आणि सुधारण्याची गरज आहे. सीमांचे संरक्षण, शिस्तबद्ध प्रशासन, आणि राष्ट्रीय हिताची भावना पुन्हा जागृत करण्याचा संकल्प व्यक्त केला. याव्यतिरिक्त, ट्रम्प यांनी उद्योगपती एलोन मस्क यांचे आभार मानले. निवडणुकीत मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि आर्थिक मदतीबद्दल त्यांनी मस्क यांचे कौतुक केले. मस्क यांनीही ट्रम्प यांना उत्साहाने पाठिंबा दिला होता.