गाव विकास समिती, रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड यांचा आरोप…
सर्पदंशावर जिल्ह्यात तालुका पातळीवर उपचार व्हावेत यासाठी गाव विकास समितीने दिलेले निवेदन प्राप्तच झाले नसल्याचे आरोग्य मंत्र्यांचे तारांकित प्रश्नाला उत्तर..
रत्नागिरी:- शेतीच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यात तालुका पातळीवर सर्प दंशावरील औषधे उपलब्ध व्हावीत या अनुषंगाने गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात पत्र दिले होते.मात्र या संदर्भात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आ.कपिल पाटील, आ.सुनील शिंदे यांनी आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता अशा स्वरूपाचे पत्रच स्थानिक पातळीवर प्राप्त झाले नसल्याचे उत्तर आरोग्यमंत्र्यांनी दिल्याने जिल्ह्यातील आरोग्यवस्थेबाबत आरोग्य मंत्री गंभीर आहेत का?असा सवाल गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम असावी व शेतीच्या हंगामात नागरिकांना सर्पदंशावरील उपचार हे तालुक्याच्या ठिकाणीच उपलब्ध व्हावे यासाठी 5 ऑक्टोबर रोजी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र दिले होते. या पत्रात त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्पदंशाने बाधित नागरिकांना उपचारासाठी रत्नागिरी अथवा त्यानंतर कोल्हापूर यासारख्या ठिकाणी जावे लागते असे म्हटले होते. नागरिकांची गैरसोय होऊ नये व वेळेत उपचार व्हावेत यासाठी तालुका पातळीवरच सर्पदंशावरील सर्व उपचार वेळेत उपलब्ध व्हावेत अशी मागणी या पत्राद्वारे सुहास खंडागळे यांनी केली होती.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. कपिल पाटील आ. सुनील शिंदे व आ. पोतनीस यांनी हिवाळी अधिवेशनात आरोग्यमंत्र्यांना तारांकित प्रश्नाद्वारे याबाबतची माहिती विचारली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशाचे उपचार व्हावेत यासाठी गाव विकास समिती रत्नागिरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे हे खरे आहे काय ?असा प्रश्न आरोग्यमंत्र्यांना विचारला होता. यावर उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशाचे उपचार व्हावेत यासाठी गाव विकास समिती रत्नागिरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेले निवेदन स्थानिक स्तरावर प्राप्त झालेले नाही असे उत्तर दिले आहे.यावर बोलताना गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी स्थानिक आरोग्य विभाग व आरोग्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील गंभीर प्रश्नाबाबतची निवेदने स्थानिक स्तरावर प्राप्त होत नसतील तर आरोग्य विभाग किती गंभीर आहे हे समजते असे उदय गोताड यांनी म्हटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्यवस्थेबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत गंभीर आहेत का? असा सवालच उदय गोताड यांनी विचारला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात शासकीय आरोग्यवस्था पूर्णता कोलमडलेली आहे. नागरिकांना वेळेवर उपचार उपलब्ध होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. नागरिकांना उपचारासाठी रत्नागिरी अथवा गंभीर परिस्थितीत कोल्हापूर मुंबईकडे जावे लागते.याबाबत गाव विकास समिती मागील काही वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत असून प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करावी अशी मागणी केली जात आहे. मात्र अधिवेशनादरम्यान आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावरून रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्यवस्थेबाबत आरोग्य मंत्री गंभीर नसल्याचे उदय गोताड यांनी म्हटले आहे.तसेच गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना 5 ऑक्टोबर रोजी दिलेले पत्र आरोग्यमंत्र्यांना हवे असेल तर आम्ही पोहच करतो असा टोलाही गोताड यांनी लगावला आहे.