
मुंबई/ प्रतिनिधी- मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत मोठा वाद निर्माण झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुलाबा परिसरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नाहीत, असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच बीएसपी नेते व माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि राहुल नार्वेकर यांच्यात देखील वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ ट्विट करत ‘सन्माननीय अध्यक्ष महोदय’ असे म्हणत निशाणा साधला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल नार्वेकर हे थेट माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची तातडीने सुरक्षा काढून घेण्यास मुंबई पोलिसांना सांगताना दिसून आले आहेत. त्यांनी जॉइंट सीपींना फोन लाऊन थेट सुरक्षा आत्ताच्या आत्ता काढा, हा विधानसभा अध्यक्षांचा आदेश आहे, असे म्हणत असल्याचे दिसून येत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये नेमके काय आहे?..
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी धमकीचा इशारा देण्याच्या पद्धतीत बोलताना दिसून येत आहे. राहुल नार्वेकर हरिभाऊ राठोड यांना उद्देशून बोलताना म्हणाले, जर तुम्हाला सहकार्य करायचे नसेल, तर सुरक्षा मिळणार नाही. यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी आम्ही आंदोलनकर्ते असल्याचे सांगितले. तसेच हरिभाऊ राठोड यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत राहुल नार्वेकरांना उद्देशून म्हटले कीम तुम्ही मला फासावर पण चढवू शकता. यावर राहुल नार्वेकर म्हणतात, हे तुम्हाला माहिती असून सुद्धा असे का वागता? हरिभाऊ राठोड आता तुम्ही रिटायर व्हा आणि आराम करा, असेही नार्वेकर म्हणाले.
काय आहे प्रकरण?..
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 30 डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. याच दिवशी कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 मधून राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक, बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या अर्ज प्रक्रियेदरम्यान राहुल नार्वेकर स्वतः उपस्थित होते. याच उपस्थितीवरून वादाला तोंड फुटले आहे. इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आरोप केला आहे की, नार्वेकर यांच्या उपस्थितीमुळे दबावाचे वातावरण निर्माण झाले आणि काही उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले.
दरम्यान, निवडणूक आयोगाचा अहवाल काय निष्कर्ष काढतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जर तक्रारींमध्ये तथ्य आढळले, तर निवडणूक प्रक्रियेतील गंभीर उल्लंघन म्हणून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आरोप निराधार ठरल्यास विरोधकांच्या राजकीय डावपेचांवरही प्रश्न उपस्थित होतील. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत हे प्रकरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काही दिवसांत या वादावर निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर