जनशक्तीचा दबाव न्यूज | पुणे | फेब्रुवारी ०५, २०२३.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बोर्ड परीक्षेची हॉल तिकीट विद्यार्थ्यांसाठी ६ फेब्रुवारी दुपारी ०३:०० वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. सर्व माध्यमिक शाळांनी दहावी बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्रिंट करुन द्यायचे आहे.
हॉल तिकीट प्रिंट करुन देताना त्यासाठी कुठलेही शुल्क आकारु नये, सोबतच प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकाचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी, अशा सूचना बोर्डाने केल्या आहेत. हॉल तिकीटामध्ये विषय आणि माध्यम यामध्ये बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. हॉल तिकीटामध्ये फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ या संदर्भात दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायचे आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास, संबंधित माध्यमिक शाळांनी त्याची पुन्हा प्रिंट काढून त्यात लाल शाईने द्वितीय प्रत म्हणजेच डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.
दहावी बोर्डाच्या परीक्षा या दि. २ मार्च ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहेत. त्याआधी विद्यार्थ्यांना सोमवारी ६ फेब्रुवारीला दुपारी ०३:०० वाजल्यापासून हॉल तिकीट उपलब्ध करुन दिले जातील. त्यामुळे हॉल तिकीटामध्ये काही सुधारणा असतील तर त्यासाठी पुरेसा वेळ विद्यार्थ्यांकडे असणार आहे. दरम्यान, परिक्षा केंद्रांवर उशिराने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. ११:०० वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर १०:३० वाजता हजर राहणे अनिवार्य आहे. तर, दुपारी ०३:०० च्या परीक्षेसाठी ०२:३० वाजता उपस्थित रहावे लागणार आहे.
दिलेल्या वेळेनंतर परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागणार आहे. पूर्वी १० मिनिटांची सूट होती. परंतु, विद्यार्थ्यांकडून या सवलतीचा गैरफायदा घेण्यात आला होता. परिक्षा कॉपीमुक्त होण्याकरता शिक्षण मंडळाने पावलं उचलली आहे. कॉपी करताना पकडल्यास विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी खास अधिकारीही नेमण्यात आले आहेत, त्यांच्याकडून परीक्षा केंद्रांवर विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांवर करडी नजर असणार आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.