संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्याच्या जनता दरबाराला मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच काही विभागाचे प्रमुख अधिकारीच उपस्थित नसल्याने उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सावंत यांनी संताप व्यक्त केला.
आपण काय टाईमपास करायला जनता दरबार घेतला आहे का असा सवाल करीत या अधिकाऱ्यांना तात्काळ बोलावून घ्या अशा सूचना यावेळी सामंत यानी केल्या.
या जनता दरबारात विकास कामांबरोबरच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बोर ब्लास्टिंग व जलजीवन मिशन यावर चर्चा होत हे मुद्दे गांभीर्याने घेण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
संगमेश्वर तालुक्याचा जनता दरबार शनिवारी दुपारी देवरुख पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री सामंत यांनी अनेक प्रश्नांची उकल करत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा प्रशासन अधिकारी तुषार बाबर, माजी आमदार सदानंद चव्हाण, राहुल पंडित, राजेश मुकादम, प्रांताधिकारी सूर्यवंशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सध्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम संगमेश्वर तालुक्यातील पट्ट्यात सुरू असून यावेळी महामार्गावर ठेकेदार कंपनीकडून बोअर ब्लास्टिंग करण्यात येत असल्याचा मुद्दा तेथील ग्रामस्थांनी उपस्थित केला. या बोअर ब्लास्टिंग मुळे घरांना तडे जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. याकडे पालकमंत्री श्री सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना गांभीर्याने हा मुद्दा घेतला पाहिजे असे सुचित करत यापूर्वी देखील या ठेकेदार कंपनीला सूचना दिलेल्या असताना सुद्धा त्यांनी यात काही सुधारणा न केल्यामुळे पुन्हा एकदा भेट देऊन यापुढे बोअर ब्लास्टिंग होता नये अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना द्या असेही सांगितले. तसेच ज्या घरांना तडे गेले असतील त्याचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई म्हात्रे कंपनीकडून घ्या अशी स्पष्ट केले.
याबरोबरच जलजीवन मिशनची कामे ज्या ठेकेदारांनी अर्धवट ठेवली आहेत अशा ठेकेदारांन मुदत देऊन ती पूर्ण करा अन्यथा अन्यथा त्यांना काळ्या यादीत टाका असेही आदेश दिले.तळेकांटे येथील येथील घरांना धोका निर्माण झाला असून नदीमध्ये जाणाऱ्या वाळू सदृश्य गाळामुळे पाणी प्रश्नाचा मुद्दा देखील ऐरणी वरती आला असल्याचेही तेथील ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
पांगरी मार्गावरील पाटगाव घाटी येथील रस्ता अर्धवट करण्यात आला असल्याने त्याबाबत येत्या ४ जुलैपर्यंत त्याची मोजणी करून तो प्रश्न मार्गी लावा अशाही सूचना दिल्या.
याबरोबरच सार्वजनिक बांधकाम, महसूल, नगरपंचायत, कृषी, वनविभाग, महावितरण, पंचायत समिती, भूमी अभिलेख आधी विविध विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना पालकमंत्री दिवसांमध्ये दिल्या तसेच यावेळी विविध विकास कामांना देखील मंजुरी दिली.
यावेळी तहसीलदार अमृता साबळे, गटविकास अधिकारी भरत चौगुले, देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार संगमेश्वर चे निरीक्षक श्री गावित उपस्थित होते.