चाकरमान्यांकरीता गणपती उत्सवासाठी कोकणात एसटीच्या ५००० जादा बसेस २२ जुलै पासून गट आरक्षणाला सुरुवात…

Spread the love

मुंबई : २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते  गणपती उत्सवाच्या जादा वाहतूकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते.
      
मंत्री सरनाईक म्हणाले की, गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफा -तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. यंदा सुमार ५००० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील.


       
सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे, उपलब्ध होणार आहे.
      
गणपती उत्सवासाठी  एसटीने तब्बल ५००० जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. २२ जुलै पासून गट आरक्षणाला सुरुवात होणार आहे ,  जादा बसेस मध्ये व्यक्तिगत आरक्षणा बरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे.  गट आरक्षण २२ जुलै पासून सुरू होत आहे. २३ ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ४३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या.
      
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत.

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page