गुहागर तालुक्यातील वरवेली येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपुजन… प्रत्येक तालुक्यात 1 मेगा वॕट सौर ऊर्जा प्रकल्प – पालकमंत्री उदय सामंत…

Spread the love

*रत्नागिरी, दि. १८ (जिमाका) – गोळपमध्ये 1 मेगा वॕट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित  करण्यात आला आहे. वरवेलीमध्ये दुसऱ्या प्रकल्पाचे आज भूमिपुजन  झाले आहे. प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे सौर ऊर्जा प्रकल्प करु, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.*
   
वरवेली येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, प्रकाश साळवी, माजी सभापती पुर्वी निमुणकर, माजी जि.प. सदस्य नेत्रा ठाकूर, राहूल पंडित, सरपंच नारायण आगरे आदी उपस्थित होते.


 
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, 1 मेगा वॕट क्षमतेचा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प गोळप येथे कालपासून कार्यान्वित झाला. दुसऱ्या प्रकल्पाचे आज भूमिपुजन झाले आहे. हा देखील लवकरच पूर्ण  होईल. विकासाचे काम करताना सगळे व्यासपीठावर एकत्र आलो. विकासाची संकल्पना मांडली, त्या लोकप्रतिनिधींना निधी उपलब्ध करुन दिला आहे. तो देणं माझी जबाबदारी आहे.
  
सिंधुरत्न समृध्द योजनेमधून महिला बचत गट, प्रभागसंघाना टुरिस्ट बस देणारा राज्यातला पहिला जिल्हा आहे. अजून 21 बसेस देणार आहोत. पाच पाच कोटींच्या हाऊस बोट देखील मंजूर केल्या आहेत. महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहे. हे पैसे काढण्यासाठी बँकांनी महिलांना ताटकळत बसवू नये. अन्यथा त्यांच्यावर एफआयआर दाखल केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.


   


आमदार श्री. जाधव म्हणाले, 1 मेगा वॕट सौर ऊर्जा प्रकल्पातून 19 लाख युनिट वर्षाला वीज निर्मिती होणार आहे.  ही वीज आपल्याच तालुक्यात वापरण्यासाठीच सोय करण्यात आली आहे. ही वीज स्ट्रीट लाईटसाठी वापरली जाणार असल्याने, ग्रामपंचायतींवरील आर्थिक भार कमी होईल. हे पॅनल स्वयंचलित असल्याने सूर्याच्या दिशेने फिरणार आहेत, असेही ते म्हणाले.
 
प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, जिल्हा वार्षिक  नियोजन 2023-24 अंतर्गत हा सौर ऊर्जा प्रकल्प करण्यात येत आहे. यातून वर्षाला 19 लाख युनिटची निर्मिती होणार आहे. त्याचा फायदा ग्रामपंचायतींना मिळणार आहे. 
   
कोनशिला अनावरण करुन आणि कुदळ मारुन या प्रकल्पाचे भूमिपुजन करण्यात आले. सरपंच, उपसरपंच यांच्यासह प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page