देवरूख- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद स्मारक स्थळावर कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कारगिल विजय दिन हा पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रतिवर्षी शहीद स्मारक स्थळावर आयोजित करण्यात येतो. या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला, यावेळी भारतीय सैन्यदलाला भारतीय हवाईदलानेही या विजयात मोलाचे योगदान दिले होते. या युद्धात सुमारे ५५० जवानांना वीर मरण आले तर १,४०० च्या आसपास जवान जखमी झाले होते. या सर्व शूरवीरांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शहीद स्मारक स्थळी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शैक्षणिक आस्थापनातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच देशप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
शहीद स्मारक स्थळावर संस्था कार्यवाह शिरीष फाटक यांनी पुष्प करंडक अर्पण करून सर्वप्रथम अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमात नेव्ही व आर्मी युनिटच्या एन.सी.सी. कॅडेटने अनुक्रमे प्रा. उदय भाटे व प्रा. सानिका भालेकर यांच्या नेतृत्वाखाली सलामी दिली. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांना पंच प्रण प्रतिज्ञा प्रा. उदय भाटे यांनी दिली. श्री. मदनजी मोडक यांनी कारगिल युद्ध व त्या ठिकाणची प्रतिकूल परिस्थिती याबाबतचा आढावा घेतला. श्री. मोडक यांनी मेजर पद्मपाणी आचार्य (महावीर चक्र) यांनी कारगिल युद्धात मातृभूमीसाठी केलेल्या धाडसी कर्तुत्वाबाबतचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर विशद केला. शहीद स्मारक स्थळी अभिवादन कार्यक्रमासाठी संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण चाचे व विलास तावडे यांनी मेहनत घेतली.
फोटो- १. शहीद स्मारक स्थळी अभिवादन करताना संस्था कार्यवाह श्री. फाटक आणि इतर मान्यवर.
२. उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. मोडक आणि उपस्थित मान्यवर.