चिपळूण नागरी पतसंस्थेचा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव..

Spread the love

चिपळूण : चिपळूण नागरी ही केवळ कोकणातील नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी पतसंस्था आहे. ३५० कर्मचारी… हजारो सभासद… करोडोंच्या ठेवी, असे वैभव निर्माण करणारे सुभाषराव चव्हाण म्हणजे माणसं निर्माण करणारा कारखाना आहेत, केवळ कर्ज देऊन आणि वसुली करून ते थांबले नाहीत, तर ज्यांनी कर्ज घेतले जे व्यवसायात यशस्वी झाले, त्यांचा सन्मान करणारी… गौरव करणारी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ही एकमेव पतसंस्था ठरली आहे, असे गौरवोद्गार बाबासाहेब रत्नाप्पा कुंभार विचार मंचाचे संस्थापक, विचारवंत, कथाकार बाबासाहेब परीट यांनी काढले. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा ३१वा वर्धापन दिन व सहकार गौरव सोहोळा रविवारी बहादूरशेख नाका येथील पतसंस्थेच्या सहकार भवनमध्ये संपन्न झाला.
सेवानिवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग श्री. एस. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे माजी सहनिबंधक लेखा परीक्षण श्री. तानाजी कवडे, जयसिंगपूर येथील विचारवंत बाबासाहेब परीट, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, चिपळूण नागरीचे संस्थापक व अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका स्मिताताई चव्हाण, ॲड. नयना पवार, सूर्यकांत खेतले, अशोक साबळे, वाशिष्ठी डेअरीचे संचालक, यशस्वी उद्योजक प्रशांत यादव यांच्यासह सर्व संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.

बाबासाहेब परीट पुढे म्हणाले की, कर्ज देणे आणि वसूल करणं हे केवळ सहकाराचे काम नाही, तर त्याला धनसंचायाची आवड लागली पाहिजे, अशा पद्धतीने काम करणारी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था एकमेव आहे. सर्वसामान्य माणसांच्या चुली पेटल्या पाहिजेत, असा उद्देश चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवला आहे आणि आज ३००हून अधिक सभासदांचा गौरव झाला, यातूनच चिपळूण नागरी पतसंस्थेची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे असे दिसून येते, असेही त्यांनी सांगितले. चिपळूण नागरी पतसंस्थेच्या सभासदांनी रस्ता सजविला आणि तो किनारा आज आम्हाला दाखविला, असे सांगत चिपळूण नागरी पतसंस्थेच्या कामाचे त्यांनी भरभरून कौतुक केले.

प्रास्ताविक संस्थेचे सरंस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी केले. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची नोंदणी जेव्हा मी केली, तेव्हा डोक्यात जो हेतू होता, तो आता प्रत्यक्ष दिसत आहे. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून सहकारातून एक मोठा नवा प्रकल्प उभा राहिला आहे. ३१ हजार लिटर दूध शेतकरी डेअरीवर देतात. महिन्याला साडेतीन कोटी रुपये शेतकऱ्यांना वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून वाटप केले जातात. सहकारातून हे मोठे काम झालं आहे आणि याचा आपल्याला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. पतसंस्थेत संचालकांसह चोवीस-चोवीस तास काम करणारी मुलं आहेत. ही सर्व मंडळी कुठलाही स्वार्थ न ठेवता काम करतात. चिपळूण नागरी पतसंस्थेमुळे आज हजारो मुले उभी राहिली आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली, याचे समाधान असल्याचेही सुभाषराव चव्हाण यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या मध्यंतराला संंस्थेच्या सहकार्यातून व्यवसायात आर्थिक सक्षम झालेल्या खातेदारांचा सत्कार करण्यात आला.

सत्कार मूर्तींच्यावतीने मनोगत व्यक्त करताना कापसाळ येथील यशस्वी व्यावसायिक सतीश मोरे यांनी चिपळूण नागरी पतसंस्थेमुळे आपण व्यावसायिक ते उद्योजक, अशी झेप घेऊ शकलो, असे सांगितले. श्री. आबा निकम यांनी बँकेच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सावर्डेतील सुभाष सावंत यांनीही व्यावसायिकांचा गौरव केल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच चिपळूण नागरीमुळे आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या शिक्षित झाले, असेही त्यांनी सांगितले. राजेंद्र शेलार यांनी चिपळूण नागरी पतसंस्थेची वसुली समाधानकारक असल्याचे व जाचक नसल्याचे सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी ब्रिटिशांनी सावकार कायदा आणल्याचे सांगत सावकाराने कर्जदारांना लुटले. परंतु चिपळूण नागरी पतसंस्थेने कर्ज घेणाऱ्यांचा सत्कार केला आणि अशा पद्धतीने कर्जदारांचा सत्कार करणारी चिपळूण नागरी हे महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था असल्याचे सांगितले.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे निमंत्रण आले की मला या ठिकाणी यायला आनंद वाटतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सध्या क्रिकेटचा विश्वचषक सुरू आहे, ११ खेळाडू राखीव, व्यवस्थापक असे मिळून प्रत्येक संघात १९जण असतात. चिपळूण नागरी पतसंस्थेचे संचालकही १९ आहेत. भारतीय संघातील १९जण विश्वचषक जिंकून आणतील, तर हे चिपळूण नागरीचे १९ संचालक सहकार जिंकतील, असा विश्वास मधुकर भावे यांनी व्यक्त केला. संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी राजकारण नाही… सहकार आहे… लक्ष्मी हा चिपळूण नागरी पतसंस्थेचा लोगो आहे. प्रत्येकाच्या घराघरात आनंदाने लक्ष्मी नांदावी, हे ध्येय चिपळूण नागरी पतसंस्थेचे असून ते यशस्वीपणे संस्था पार पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. एस. बी. पाटील यांनीही या वेळी मार्गदर्शन केले व चिपळूण नागरी पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या व निवृत्तीनंतर आता आपले चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला सातत्याने मार्गदर्शन लाभेल, अशी ग्वाही दिली. सेवानिवृत्त सहनिबंधक श्री. तानाजी कवडे यांनी चिपळूण नागरी पतसंस्थेला ३१व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. ज्याची पद बाजारात नाही, त्याची पत निर्माण करण्याचे काम पतसंस्था करते आणि म्हणून ती सामान्य माणसांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते, असे सांगून चिपळूण नागरी पतसंस्थेने ही भूमिका गेल्या ३१ वर्षांत जपली आहे. म्हणूनच चिपळूण नागरी पतसंस्था अग्रस्थानी आहे. एखादी पतसंस्था १००० कोटींच्या ठेवी पूर्ण करते, ही सोपी गोष्ट नाही.

कोकणात एक हजार कोटी ठेवी पूर्ण झालेली पतसंस्था अद्याप नाही आणि होणारही नाही, असेही श्री. कवडे यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. चिपळूण नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, नि:स्पृहपणे ग्राहकांना सेवा देतात. समाजाच्या उन्नतीसाठी ही पतसंस्था काम करते, अशा शब्दात त्यांनी चिपळूण नागरिक सहकारी पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत मोजक्या शब्दात पंसस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी हजेरी लावून संस्थेच्या वर्धापन दिनानमित्त शुभेच्छा दिल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page