कोथिंबीर हा ओल्या मसाल्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. वाटण करण्यासाठी, एखाद्या पदार्थावर घालण्यासाठी आणि पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी आवर्जून कोथिंबीरीचा वापर केला जातो. अनेक महिलांना तर कोथिंबीर नसेल तर स्वयंपाक करायला सुचत नाही. हिरवीगार कोथिंबीर नुसती पाहूनही आपल्याला छान वाटते. कोथिंबीरीच्या वड्या, चटणी, पराठा असे पदार्थही अतिशय चविष्ट होतात. कोणत्याही पदार्थावर हिरवीगार कोथिंबीर असली की त्याला एक वेगळा स्वाद येतो आणि दिसायलाही तो पदार्थ एकदम आकर्षक दिसतो
कोथिंबीरीमध्ये असणारे कॅल्शियम आणि इतर घटक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यामुळे रोजच्या आहारात कोथिंबीरीचा आवर्जून समावेश करायला हवा असे वारंवार सांगितले जाते. पण आपल्याला माहित असलेल्या कोथिंबीरीच्या फायद्यांशिवायही आरोग्यासाठी ही कोथिंबीर उपयुक्त असते. प्रसिद्ध युट्यूबर स्मिता देव कोथिंबीर आहारात असण्याचे महत्त्व सांगतात.
कोथिंबीर एखाद्या पदार्थावर घालायची असेल तर नेमकी कधी, कशी घालावी याविषयीही एक अतिशय महत्त्वाची टिप देतात. पाहूयात त्या नेमकं काय सांगतात…
- १. कोथिंबिरीमुळे अॅसिडीटीची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- २. खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी आवश्यक असलेले पाचक रस तयार होण्यास कोथिंबीरीचा चांगला उपयोग होतो.
- ३. पदार्थावर हिरवीगार कोथिंबीर असेल तर पदार्थ छान दिसण्यास मदत होते.
- ४. मात्र गरम पदार्थावर कोथिंबीर घातली की तिचा फ्लेवर कमी होतो आणि रंगही बदलतो. त्यामुळे कोथिंबीर छान हिरवीगार राहावी यासाठी ती पदार्थ थोडा थंड झाल्यावर वरून कोथिंबीर भुरभुरावी
- ५. त्यामुळे दिसायला आणि आरोग्याला दोन्हीला चांगली असलेली कोथिंबीर वड्या, पराठा, सूप, वरून घालण्यासाठी अशी विविध मार्गांनी आहारात आवर्जून समाविष्ट करायला हवी