सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा आहुजा (Govinda Join Shivsena) यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं गोविंदा यांना उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, असं असतानाच ‘गोविंदाला निवडणूक लढवण्यात रस नाही. तर स्टार प्रचारक व्हायचंय. गोविंदानं तत्पूर्वी शिवसेना उबाठा गटाकडं प्रवेशासाठी इच्छा व्यक्त केली होती’, असा खुलासा माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी केला आहे.
मुंबई : अभिनेता गोविंदा आहुजा (Govinda Join Shivsena) यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. 14 वर्षांच्या वनवासानंतर आपण पुन्हा एकदा राजकारणात आलोय आणि आता सक्रिय राजकारणात भाग घेणार असल्याचं गोविंदा यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं गोविंदा यांना उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावरच आता माजी आमदार विनोद घोसाळकर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई उत्तर मतदारसंघासाठी मागणी : यासंदरभात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना विनोद घोसाळकर म्हणाले की, “गोविंदा यांनी 2004 मध्ये उत्तर मुंबई मतदार संघातून भाजपाचे राम नाईक यांचा पराभव करत विजय संपादन केला होता. त्याच मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी यासाठी गोविंदा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ही जागा आपण काँग्रेससाठी सोडल्याचे गोविंदा यांना सांगितले. त्यानंतर गोविंदा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या मतदारसंघात खासदार म्हणून गोविंदा यांचा फारसा प्रभाव नव्हता आणि त्यांचे खासदार म्हणून कार्य चांगले नव्हते. काँग्रेसचे खासदार म्हणून त्यांचा वाईट अनुभव असल्याबद्दल राहुल गांधी यांनी गोविंदा यांचा हा प्रस्ताव नाकारला.”
स्टार प्रचारक म्हणून प्रस्ताव….
पुढं ते म्हणाले की, “त्यानंतर गोविंदा यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की, मला निवडणूक लढवण्यात रस नाही मला स्टार प्रचारक म्हणून काम करायला आवडेल. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी दोन वेळा बैठकाही पार पडल्या. मात्र, यासाठी गोविंदा यांनी सांगितलेली रक्कम ठाकरे यांना मान्य झाली नाही आणि तो प्रस्ताव बारगळला”, असं घोसाळकर म्हणाले.
स्टार प्रचारक म्हणूनच काम करतील….
“गोविंदा यांनी खासदार मिलिंद देवरा यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना उत्तर मुंबईला लागून असलेल्या उत्तर पश्चिम मतदार संघामधून उमेदवारी देण्याबाबत विनंती केली. मात्र उत्तर पश्चिम मधून उमेदवारी देण्याविषयी शिंदे यांनी असमर्थता दर्शवल्यानंतर अखेरीस गोविंदा यांनी आपण स्टार प्रचारक म्हणून काम करत राहू असे सांगितले. त्यांचा हा प्रस्ताव शिंदे यांनी मान्य केला. त्यामुळे आता गोविंदा हे निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार नाहीत तर स्टार प्रचारक म्हणूनच काम करतील”, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात उत्तर पश्चिम मतदार संघातील विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गोविंदा यांना जर पक्षानं उमेदवारी दिली तर आपण नक्कीच त्यांचा प्रचार करू.