मुंबई- मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईकरांना मुंबई ते नवी मुंबई अवघ्या 20 मिनिटांत गाठता येणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकचे (MTHL) 16.5 किमी लांबीचे काम 25-26 मे पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सी लिंकसाठी संपूर्ण डेक तयार झाल्यानंतर पुलावर वाहनांना परवानगी दिली जाईल.
एकदा हा पूल पूर्ण झाल्यावर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू असेल आणि अंदाजे 70,000 वाहने यावरून प्रवास करू शकतील. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी मुंबईला नवी मुंबईशी जोडण्याचे एमटीएचएलचे उद्दिष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डेकचे लाँचिंग पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीए वॉटरप्रूफिंग, डांबरीकरण आणि सी लिंकवर क्रॅश बॅरिअर्स बांधण्यावर भर देईल. प्राधिकरण सीसीटीव्ही कॅमेरे, लॅम्पपोस्ट आणि टोल इन्फ्रास्ट्रक्चर बसवण्याचे काम सुरू करणार आहे. ओपन रोड टोलिंग प्रणालीसह एमटीएचएल हा भारतातील पहिला सागरी पूल असेल. वाहतूक कोंडी कमी कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरे बसवण्याचीही एमएमआरडीएची योजना आहे.
या कॅमेर्यांच्या अंमलबजावणीमुळे नियंत्रण कक्षाला वाहनांच्या बिघाडांवर लक्ष ठेवण्यास आणि त्वरित मदत पाठवून वाहतूक कोंडी होण्यापासून रोखण्यास मदत होणार आहे. सुमारे 18,000 कोटी रुपये खर्चून बांधलेले एमटीएचएल सागरी सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासात वेळेची मोठी बचत होणार आहे. मध्य मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले हा प्रवास 15 ते 20 मिनिटांत करता येणार आहे. 22 किमी लांबीच्या या पुलामुळे गोवा, पुणे आणि नागपूर ही ठिकाणे मुंबईच्या जवळ येतील. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विकसित करत आहे.