गोल्डन बॉय नीरज चोप्राला मानाचं पद; टेरिटोरियल आर्मीत बनला लेफ्टनंट कर्नल…

Spread the love

नवी दिल्ली l 15 मे– सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याला प्रादेशिक सैन्यात (टेरिटोरियल आर्मी) लेफ्टनंट कर्नलची मानद रँक प्रदान करण्यात आली आहे. साप्ताहिक सार्वजनिक पत्रिका आणि केंद्र सरकारच्या गॅझेटनुसार नीरज चोप्राची नियुक्ती 16 एप्रिल 2025 पासून प्रभावी झाली आहे. केंद्र सरकारच्या गॅझेटनुसार प्रादेशिक सेना विनियम 1948 मधील परिच्छेद 31 नुसार प्रदत्त अधिकारांचा वापर करून राष्ट्रपती नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल पदाची रँक प्रदान करण्यात आली आहे.

नीरजने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले होते. ऑलिम्पिकमधील ट्रॅक अँड फील्ड इवेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. यानंतर नीरजने 2024 मधील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवले होते. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू अरशद नदीमने सुवर्णपदक जिंकलं होतं. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ब्राँझ पदकाची कमाई केली होती.

2016 मध्येच आर्मी जॉइन
हरियाणाचा रहिवासी असलेला नीरज याआधी भारतीय सैन्यात सुभेदार मेजर या पदावर तैनात होता. सैन्यात असतानाच उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला विशिष्ट सैन्य पदकाने गौरवण्यात आलं होतं. नीरज सर्वात आधी 26 ऑगस्ट 2016 रोजी भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावर ज्यूनियर कमिशंड अधिकारी म्हणून भरती झाला होता. नंतर 2021 मध्ये सुभेदार या पदावर बढती मिळाली. 2022 मध्ये पुन्हा प्रमोशन घेऊन नीरज सुभेदार मेजर झाला होता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page